गरीब रुग्णांसाठी खास दहा बेड राखीव
कमीत कमी खर्चात उपचार
डोंबिवली / शंकर जाधव : शहरातील लोकसंख्या वाढली की आरोग्य व शिक्षण सेवा पुरवणे आवश्यक ठरते.ऐतिहासिक नगरी म्हणून नावाजलेल्या कल्याण नगरीत सुसज्ज अशा ओएसिस रुग्णालयाचे उदघाटन शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर व आयएमए एक्स प्रेसिडेंट डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे या रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी खास दहा बेड राखीव ठेवून कमीत कमी खर्चात त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे यावेळी रुग्णालय व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले आहे.
कल्याण आधारवाडी डीबी चौक येथे अद्ययावत सुसज्ज असे 40 बेडचे ओएसिस हॉस्पिटल सुरू झाले.या रुग्णालयात अकरा बेडचे अतिदक्षता विभाग, दोन ऑपरेशन थिएटर, एक लेबर ऑपरेशन थिएटर, एक बर्न स्पेशल वॉर्ड, २४ तास मेडिकल व पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा आहेत.रुग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी यावेळी माजी नगरसेवक अर्जुन भोईर, जयवंत भोईर सुनील वायले, आयएमए प्रेसिडेंट डॉ. ईशा पानसरे, उद्योजक दीपक भंडारी, उद्योजक मच्छिंद्र जाधव आणि डॉक्टर्स उपस्थित होते. सूत्रसंचालन जबाबदारी कलाकार प्रणव भांबुरे यांनी सांभाळली.
फिजिशियन डॉ. दयानंद ढेकणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजेश पाखरे, प्लास्टिक सर्जन डॉ. पराग तेलवणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गणेश शिरसाठ अशा कल्याण मधील चार सुप्रसिद्ध डॉक्टरांनी मिळून ओएसिस हॉस्पिटल सुरू केले आहे. विशेष सांगायचं झालं तर गरीब रुग्णांसाठी खास दहा बेड राखीव ठेवून कमीत कमी खर्चात त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे यावेळी हॉस्पिटल मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले.