डोंबिवली / शंकर जाधव : मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करताना मोबाईलवर बोलत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला प्रवाशांनी पाठलाग करून पकडले. ही घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात घडली.कल्याण लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकून गजाआड केले.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र मारुती धूळधुळे असे पकडलेल्या चोरट्याचे नाव असून तो ठाणे येथील घोडबंदर परिसरात राहतो. फिर्यादी अनिरुद्ध शर्मा यांच्या फिर्यादीवरून महेंद्रवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अनिरुद्ध हे उत्तर प्रदेश येणाऱ्या राजेंद्र प्रसाद पटना एक्स्प्रेसने २७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता मुंबईकडे निघाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही गाडी कल्याण स्टेशन जवळ येत असताना शर्मा आपल्या जागेवर बसून मोबाईलवर बोलत होते. त्यांच्या समोरच्या सीटवर महेंद्रने हातातील मोबाईल खेचून पळण्याचा प्रयत्न केला.
मात्र शर्मा यांनी त्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने धक्का दिल्याने ते रॉडर आदळत जखमी झाले मात्र तरीही अनिरुद्ध यांनी चोरट्याला सोडले नाही. गाडी कल्याण स्थानकात थांबताच महेंद्रने गाडीच्या दुसऱ्या बाजूने उडी मारत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही शर्मा याने त्यांच्या मागे उडी मारत त्याला पकडले. याचवेळी ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी धाव घेत त्याला ताब्यात घेत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.