दिवा / आरती मुळीक परब : आषाढी एकादशी दिवशी जन गण मन शाळेमध्ये सुद्धा दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीची पायी वारी केली. त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले.
" पाऊले चालती पंढरीची वाट" म्हणत सर्वच सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी ह्या वारीमध्ये सहभाग घेतला. संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे सर, सचिव. डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे व इतर पदाधिकारी यांनी सर्वप्रथम पांडुरंग, रुक्मिणीच्या प्रतिमेची पूजा केली. सर्वच मुले आणि मुली वारकरी वेशेभूषेत आले होते, हातात टाळ, मृदुंग, खांद्याला वीणा, तसेच सर्व मुलींच्या डोईवर तुळस होती. कुणी संत ज्ञानेश्वर बनून आले होते, तर कुणी संत तुकाराम, गाडगेबाबा, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार. जणू काही सतांची मांदियाळी शाळेत अवतरली होती. या सर्व संत महंत मध्ये विशेष आकर्षण होते ते म्हणजे
"पांडुरंग रुक्मिणी"चे.
"सावळ्या सुकुमारा तुला भेटण्याची आस,
जन्मो जन्मी तुझीच सेवा घडावी हीच कास "
साक्षात जे एम एफ चे पांडुरंग रुक्मिणी अवतरल्याने त्या पंढरीच्या पांडुरंगाला देखील हेवा वाटावा असा हा देखावा उभा होता.
अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूलचे इयत्ता सहावी, सातवीच्या जवळपास ५० मुलांनी ताल, सुराच्या गजरात ,"स्नान करा तुम्ही दोष हरा" व टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग हे दोन अभंग गाऊन त्या पांडुरंगाचे ही कान तृप्त केले. मनस्वी सावंत हिने संवादिनी वाजवून श्रोत्यांची मने जिंकली व संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी यांनी तबल्यावर साथ केली. त्याच बरोबर जन गण मन विद्यामंदिरच्या इयत्ता चौथीच्या ५० विद्यार्थ्यांनी "माऊली माऊली" आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी "अवघे गर्जे पंढरपूर" हे अभंग गाऊन प्रत्यक्षात जे एम एफ प्रांगणात पंढरीच अवतरवली. संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे सर यांनी देवशयनी एकादशीचे महत्व सांगितले, तसेच उपस्थित असलेल्या संतांची मांदियाळी बघुन संत गोरा कुंभार यांची कथा सांगून व चित्रफित दाखवून मुलांना मार्गदर्शन केले.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा.. वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. टाळ वाजवून आरती केली व उपवासाचा प्रसाद वाटप केला. विठ्ठल नामाच्या गजरात विठुरायाचा पालखी सोहळा करण्यात आला. टाळ, मृदुंग, पताके, घेऊन आमचे जे एम एफ चे वैष्णव पांडुरंगाच्या घोषात तल्लीन होऊन गेले होते. पावसाचीही तमा न बाळगता अनवाणी पायाने आणि निर्मळ मनाने दिंडी पादाक्रांत केली.