माणकोली पुलावरून मनसे – शिवसेनेत जुंपली

मोठा गाव- माणकोली पुलाच्या उद्घाटनाची तारीख ठरेना

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  मोठा गाव - माणकोली पुलावरून प्रवास करण्याची प्रतीक्षा कधी संपेल असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. `तारीख पे तारीख` असे करत करत हा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असले तरी राजकीय नेतेममंडळी मात्र निवडणुकीच्या तारखांवर लक्ष ठेवून आहेत. कोपर पुलासारखे हा पूल ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र या पुलाचे कामाचे श्रेय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तर मनसेने मात्र माणकोली पूल निवडणुकीच्या तारखांसाठी नागरिकांकरता खुला होत नसल्याचे सांगत पुलाची पाहणी केली. तर शिवसेनेचे युवा सेना सचिव यांनी स्वतःच्या मतदार संघाकडे लक्ष द्यावे असा सल्ला मनसे आमदारांना दिला.

   लोकसभा मतदार संघ, विधानसभा मतदार संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखांची वाट राजकीय पक्ष पाहत असले तरी विकास कामात या तारखा आड येत असल्याची ओरड सुरू आहे. डोंबिवलीत सर्वात चर्चेचा विषय असलेल्या मोठा गाव - माणकोली पूल नागरिकांसाठी कधी खुला होणार ? ३१ मे ही तारीख पुलाच्या उद्घाटनाची दिली असताना त्या तारखेच्या आत पुलाचे काम पूर्ण झाले नाही. पुन्हा नव्याने दिवाळी नंतर पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम दिलेल्या तारखेत पूर्ण होईल का असा प्रश्न मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी उपस्थित केला. या पुलाचे काम कुठपर्यत आले आहे यांची पाहणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

   सर्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलाचे श्रेय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे ठामपणे सांगतात, त्याच्या सरकारमध्ये हा निर्णय झाल्याचे ते सांगतात. तर मनसे आमदार पाटील यांनी पुलाचे उद्घाटन निवडणुकां समोर ठेवून करत असतील असे सांगितले. यावर युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी दोन्ही आमदारांवर खड्ड्यांवरून टीका केली.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमएमआरडीए महामंडळाची स्थापना करण्यात आली असून या महामंडळाच्या माध्यमातून वित्तीय संस्थाकडून आर्थिक फंड उपलब्ध केला जात आहे. यातून रस्त्याबरोबरच इमारती, विमानतळ, बंदरे विकसित केली जाणार आहेत. कामे करण्यासाठी दर्जेदर अधिकारी आणि ठेकेदार आहेत मात्र ठेकेदाराला केलेल्या कामाचा मोबदला वेळेत दिला जात नसल्याने कामे लांबतात म्हणूनच गतिमान सरकारच्या काळात गतिमान पद्धतीने काम करत केलेल्या कामाचा मोबदला गतिमान पद्धतीने दिला जावा यासाठीच महामंडळाच्या माध्यमातून कामे करणे गरजेचे आहे. याच गतीमन पद्धतीने विकासाचा बेकलोग भरला जाईल अशी आशा व्यक्त केली. पीडब्लूडी विभागात टेक्नोलोजीचा वापर करून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टल सुरू करणार असून नागरिकान राज्यभरातील बांधकाम विभागाच्या कामांची माहिती एका क्लिकवर दिसणार.
- रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री)

माणकोली पुलासाठी खूप तारखा दिल्या गेल्या. मागच्या वेळेला ३१ मे ही तारीख देण्यात आली होती. अजूनही तारखा येत आहे. मी मोठा गाव - माणकोली पुलाची पाहणी केली. अजूनही काम बाकी आहे. योग्य नियोजन असल्याचे दिसले नाही. इंट्री पॉईंट नाही. वास्तविक त्यांना निवडणुकीच्या तोंडावर काम खेचायचे आहे. अत्यंत शरमेची बाब आहे की दरवर्षी खड्डे भरण्यासाठी टेंडर काढले जाते. जे रस्ते बनविले जातात त्याचे खड्डे ठेकेदाराने भरायचे असते असा नियम आहे.  मात्र तसे होताना दिसत नाही. त्यांच्यावर कोणाचाही दबाव नसतो, कारण त्यांचे लागेबंदे असतात, ठेकेदारांवर निर्बंध नसल्याने कामाचा उत्तम दर्जा दिसत नाही. त्यामुळे रस्ते  पावसाळ्यात वाहून जातात.

- प्रमोद ( राजू ) पाटील ( मनसे आमदार )


     मनसे आमदार पाटील यांनी आधी स्वतःच्या मतदार संघाची पाहणी करावी. मोठा गाव-माणकोली पुलाचे काम अंतिम टप्प्यावर आले असून ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नाशिक महामार्गाला जोडण्यासाठी वेगळी व्यवस्था आवश्यक जोड मार्ग काम सुरू आहे. विकासात्मक कामे होत असतात. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पाहणीसाठी आमदारांना बोलावू. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत की खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येणार आहे.

- दिपेश म्हात्रे (सचिव युवा सेना )

8

Tag : #मोठा गाव-माणकोली पूल # मुख्यमंत्री एकनाथ शिंदे #राजू पाटील मनसे # रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री) # दिपेश म्हात्रे (सचिव युवा सेना ) # खासदार डॉ. श्रीकांत शिंदे # पालिका आयुक्त # मोठा गाव-माणकोली पूल वादाच्या भोवऱ्यात



Post a Comment

Previous Post Next Post