जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक खासदार तथा समिती अध्यक्ष डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे पार पडली.
बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या विविध विकास योजना, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा, यावर खासदार शिंदे यांनी भर दिला.
खासदार डॉ. शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा “स्मार्ट शाळा” करण्यासाठी १०० कोटींचा निधी आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच जिल्ह्यात स्मार्ट आरोग्य केंद्र उभारण्यासाठीही पुढाकार घेण्याचे निर्देश दिले.
त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय वाढविण्याचे आवाहन केले.
ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी इ-वेस्ट व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवावे, यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या. मलंगगड, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका तसेच इतर ठिकाणी सेल्फ-हेल्प ग्रुपच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन उपक्रम राबविण्याचा सल्ला देण्यात आला.
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी 'ॲक्शन मोड’
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने ॲक्शन मोड’मध्ये कामकाज सुरू करण्याचे निर्देश खासदार शिंदे यांनी दिले. तसेच स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवरही सविस्तर चर्चा झाली.
जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास
२७ गावांतील १८ शाळा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समायोजित करण्यात आल्या असून, त्या शाळांना स्मार्ट करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या १,३२९ शाळांपैकी सर्व शाळांची दुरुस्ती पूर्ण झाली असून १२ टक्क्यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे. ‘दिशा प्रकल्पा’मुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन गुणवत्तेत सुधारणा झाल्याचेही नमूद करण्यात आले.
५७ कोटी ७५ लाख निधी शाळा दुरुस्तीसाठी वापरण्यात आला असून, आता सर्व शाळा स्मार्ट बनविण्यासाठी १०० कोटींचा नव्या आराखड्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी तथा दिशा समितीचे सदस्य सचिव डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. दिशा समितीच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या बैठकीला खासदार तथा सह-अध्यक्ष नरेश गणपत म्हस्के, खासदार तथा सह-अध्यक्ष बाळ्या मामा–सुरेश गोपीनाथ म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, राजेश मोरे, सुलभा गणपत गायकवाड, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर आयुक्त मनिषा आव्हाळे, ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, भिवंडी-निजामपूर आयुक्त अनमोल सागर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक, प्रकल्प संचालक (Jilha Gramin Vikas Yojana) छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.