डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याणमध्ये बांगलादेशी महिला आढळून आल्या आहेत. महात्मा फुले चौक पोलिसांनी या महिलांसह एका भारतीय नागरिकाला देखील ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकारामुळे बाहेरच्या देशातून बिनधास्तपणे नागरिक घुसखोरी करत असल्याने सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश असून अन्य एक महिला नाव बदलून भारतात राहत असल्याची माहितीही समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लुथफा बेगम जहाँगीर आलम ( ४६ वर्षे ), जोरना जलालमियाँ अख्तार ( २३ वर्षे ) मासुमा जमीरउद्यीन (२० वर्षे) १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रघुनाथ उदय मंडल व त्याची पत्नी रितीका हे डोंबिवली पूर्वेकडील आजदेगावात राहत होते.
कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी डेपो, एकाच परिसरात असल्याने २४ तास या भागात नागरिकांची वर्दळ सुुरू असते. कल्याण एसटी डेपो, रिक्षा स्टॅन्ड परीसरात काही बांगलादेशी महिला संशयितरित्या फिरत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून भारतात विनापरवाना प्रवेश केलेल्या ५ बांगलादेशी महिला नागरिक तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. या सर्वांना हिंदी आणि मराठी भाषा समजत नाही. ५ महिलांपैकी ३ मोठ्या महिला व एक अल्पवयीन मुलगी या बांगलादेशी नागरिक असल्याचे तसेच एक महिला व तिचा पती आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला रघुनाथ उदय मंडल व त्याची पत्नी रितीका हे डोंबिवली पूर्वेकडील आजदेगाव राहत होते.
रितीका ही देखील बांगलादेशी नागरिक असल्याचेही समोर आले. ती सुमारे ५ वर्षांपूर्वी भारतात आल्याचे व तिचे खरे नाव आखी अयुबअली अख्तार (रा. सिल्लेट, जि. सोनमगज, बांगलादेश ) आहे. बांगलादेशी महिला आखी अयुबअली अख्तार हिचे रितीका रघुनाथ मंडल या नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करण्यात आले आहे या महिलांना कोणी आणि कशासाठी बोलावले याचा पोलीस तपास करीत आहे.