- माजी आमदार नरेंद्र पवार यांचे प्रतिपादन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र चिखल, घाण, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची दुरावस्था, व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्याचप्रमाणे बाजार समितीमध्ये अनधिकृत गाळे बांधून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याच्या तक्रारी बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल व ग्राहक यांनी कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारीनुसार आमदार यांनी मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पाहणी दौरा केला. यावेळी तेथील अनागोंदी कारभार पाहून बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करा व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. तसेच या कारभारा विरोधात ५ ऑगस्ट रोजी आमदार पवार यांच्या नेतृत्वात मार्केट लाक्षणिक कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा शेतकरी, व्यापारी, माथाडी व हमाल यांनी केली.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रचंड घाणीच्या साम्राज्य व अनेक असुविधांमुळे शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल व ग्राहक यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. सदर बाजार आवारात कोणत्याही प्रकारची बंदिस्थ गटर व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी मोठ्या प्रमाणत घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्याचप्रमाणे बाजार आवारातील रस्त्यांची केवळ मलमपट्टी करुन वारंवार खड्डे बुजवण्याच्या नावाखाली भष्ट्राचार केला जात आहे. बाजार आवारात कायम स्वरूपीसाठी सिमेट काँक्रिट रस्ते न बनविल्यामुळे या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गाळ व शौचालायचे सांडपाणी रस्त्यावर आले असून परिणामी मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल व ग्राहक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर बाजार आवारातील घनकचरा व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाल्यामुळे या घाणीच्या साम्राज्यात आणखीनच भर पडली आहे. त्याच प्रमाणे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने समितीच्या आवारातील इमारतींच्या बांधकामात प्रचंड अनिमियतात केली असून शौचालये तोडून, इमारतींच्या जिन्याखाली, जुन्या गाळ्यांच्या इमारतीतील मोकळे पॅसेज आदी ठिकाणी बेकायदेशीर व्यवसायिक गाळे बांधून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. तसेच बाजार आवारातील विक्रीसाठी राज्य व परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेत मालाची आवक होत असून व्यापारी आपल्या गाळ्यावर सदर मालाची विक्री करतो. मात्र गाळ्यावर संपूर्ण माल उतरवता येत नसल्याने जास्तीचा काही अंशी शेतमाल पॅसेज किंवा गाळ्यासमोर काही वेळ ठेवतो. बाजार समिती प्रशासन माथाडी कामगारांची तक्रार पुढे करुन सदरचा शेतमाल उचलून नेऊन व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची धमकी वारंवार दिली जात आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला व्यापारी मार्केट शेअर्सच्या स्वरूपात बाजार समितीला कर भरत असून कल्याण - डोंबिवली महापालिकेला मालमत्ता कर भरतात. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याने व्यापारी आक्रमक झाले.
दरम्यान याच समस्यांबाबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एपीएमसी मार्केटची पाहणी केली. यावेळी व्यापारी, माथाडी कामगारांशी चर्चा केली. आमदार नरेंद्र पवार यांनी बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. व्यापाऱ्यांना सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्यांना संचालक मंडळ वेठीस धरतेय. मुस्लिम व्यापाऱ्यांना बांगलादेशी व्यापारी म्हणून हिनवतंय हे अत्यंत निषेधार्थ आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत जरी शिवसेना भाजपची सत्ता असले तरी निवडून येणाऱ्या संचालक मंडळाला सोयी सुविधा देणे त्यांचे काम आहे. मात्र ते देऊ शकत नसतील तर हे संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी सहकार मंत्र्यांकडे करणार असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.