दोघींवर राज्यभरात १६ गुन्हे दाखल
डोंबिवली ( शंकर जाधव ) :डोंबिवलीतील ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने घेऊन पसार झालेल्या दोन महिलांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.या दोघींवर राज्यभरात १६ गुन्हे दाखल आहेत.डोंबिवलीतील ज्वेलर्समधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.अटक केलेल्या दोघी नणंद भावजय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, उषाबाई दगडू मकाळे आणि निलाबाई सूर्यभाण डोकळे असे अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. या औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरात विनायक ज्वेलर्स दुकानात दोन अनोळखी महिला आल्या होत्या. या दोन महिलांनी दुकानमालक व कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने दुकानांमधील दागिने चोरून पसार झाल्या. काही वेळाने दुकानदाराला लक्षात आले ही चोरी झाली आहे. या दोन महिलांना दुकानदाराने आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र या महिला पसार झाल्या होत्या. दुकान मालकाने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस अधिकारी बलवंत भरडे, सचिन भालेराव यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलांची ओळख पटली.पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली आहे.उषाबाई मकाळे, निलाबाई डोकळे अशी या दोन्ही महिलांचे नाव असून या दोन्ही नणंद आणि भाऊजयी आहेत. या दोघी ज्वेलर्सचे दुकाने फिरून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानातील दागिने घेऊन पसार व्हायच्या. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये या दोघींचे राहणीमान साधे होते. डोंबिवली मधील ज्वेलर्स मध्ये चोरी करताना त्या सीसीटीव्ही कॅमेरात आल्या व या दोन्ही महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या. या दोन्ही महिलांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत.