जळगाव: स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत असलेल्या कर्जामुळे ईडीने जळगावमधील सुप्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध आस्थापनांवर सलग दुसऱ्या दिवशीही ईडीकडून छापे टाकण्यात आले. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली होती, सलग दुसर्या दिवशी शुक्रवारी देखील ही कारवाई सुरू ठेवण्यात आली.
एकाचवेळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात जळगावमधील आर एल ज्वेलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील साठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राजमल लखीचंदवर ईडी कारवाई मागे राजकारण असल्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर ईश्वर बाबूजी जैन यांचे चिरंजीव माजी विधानपरिषद आमदार मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या सोबत उभे राहिले आहे. ईश्वर बाबूजी जैन हे दहा ते पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण राज्याचे खजिनदार होते. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची जागा ही ईश्वर बापुजी जैन यांच्याच नावावर आहे. मात्र ही इमारत कर्जाच्या विळख्यात आहे. राज्याचे खजिनदार असल्या कारणाने त्यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्र आणि माहिती घेण्यासाठी तर ही कारवाई केली नसावी, अशा प्रकारच्या चर्चाना उधाण आले आहे.