चेन्नई : तामिळनाडूतील पुनलपूर-मदुराई पर्यटक रेल्वे गाडीच्या कोचला लागलेल्या आगीत ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही गाडी मदुराई रेल्वे स्थानक सोडून एक किमी अंतरावर उभी होती. लखनऊ ते रामेश्वरम प्रवासास निघालेली ही गाडी मदुराई स्थानकात विसाव्यासाठी थांबली होती. मात्र अचानक डब्याला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. यात अगोदर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आगीत मृत्यू झालेल्यांची संख्या ९ वर पोहोचली आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या घटनेत आणखी २० प्रवासी होरपळले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दक्षिण रेल्वेने १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
तामिळनाडूतील पुनलपूर-मदुराई रेल्वेत शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. मदुराई यार्ड येथे खासगी डब्यात ही आग लागली असून त्यात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गॅस सिलिंडरची तस्करी करण्यात येत असल्यामुळेच ही आग लागल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. काही प्रवाशांनी गॅस सिलिंडरची चोरी केली, लोकांच्या धावपळीत काही गॅस सिलिंडर फुटल्याने आगीचा भडका उडाला. त्यामुळे आगीत रेल्वेचा संपूर्ण डबा जळून खाक झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. अग्निशामनक दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.