सिडनी: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्क दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून दोघेही बाहेर पडले आहेत. पॅट कमिन्स देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे मिचेल मार्श आता वनडे आणि टी-20 मालिकेत संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तर स्टार्कच्या अनुपस्थितीत अनकॅप्ड डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन टी-20 नंतर एकदिवसीय संघाचाही भाग असेल.
स्टीव्ह स्मिथ याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. तर मिचेल स्टार्क याला कंबरेची दुखापत झाली आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका मालिकेतून माघार घेतली आहे. स्मिथच्या जागी टी20 मध्ये एश्टर टर्नर याला स्थान दिलेय तर वनडेमध्ये मार्नस लाबुशेन याला स्थान दिलेय. मिचेल स्टार्क याच्या जागी जॉनसन याचा समावेश करण्यात आलाय.
ऑस्ट्रेलिया संघाच्या मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्याची माहिती दिली. या दोन्ही खेळाडूंना आरामाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मिथ आणि स्टार्क भारताविरोधातील मालिकेतून पुनरागमन करतील. विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे.