- आषाढी एकादशी दिवसापासून तयारी सुरू
- रक्षाबंधन किंवा गोकुळाष्टमीनंतर घराची साफसफाई
आषाढ महिन्यात आषाढी एकादशी दिवशी मातीच्या मूर्ती बनवणारे सर्व गणेश मूर्तिकार (पेंटर) आपापल्या मूर्ती कामांना याच दिवशी प्रारंभ करतात आणि त्याच दिवसापासून खरं म्हणजे गणेशोत्सव वातावरणाची निर्मिती होत असते. (सध्या तर रेल्वे आणि एसटी आरक्षणामुळे तीन महिने अगोदरच रेल्वेची बुकिंग होत असल्याने तो एक आनंदोत्सवाचा प्रारंभ म्हणायला काय हरकत नाही.) आषाढी एकादशीच्या दिवसापासून आपला गणपती कुठे असावा, कसा असावा, याविषयी कुटुंबात चर्चा सुरू होतात. आणि श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक कुटुंब आपापले श्री गणपतीचे आसन असलेला हा पवित्र पाट "पवित्र अशासाठी मी म्हणेन की या पाटाचा उपयोग फक्त श्री गणपती गजानन बसविले जातात. क्वचितच काही घराण्यामध्ये या गणपतीच्या पाटांवर नागदेवतेचे आसन म्हणून उपयोगात आणतात. जातो बाकी वर्षभर हा पाठ तसाच एका पवित्र ठिकाणी म्हणजे देवघरात आत्मीयतेने गणरायाचे आसन म्हणून ठेवला जातो. असा हा पाठ नागपंचमी दिवशी सर्व कोकणवासीय आपापल्या पेंटरकडे मूर्ती काराकडे जाऊन आपली मूर्ती कशी असावी याविषयी एक मत करून मूर्ती बनवण्यासाठी देतात त्यानंतर घरांच्या परिसर साफसफाईची सुरुवात होते. पूर्वी मातीच्या भिंती असल्यामुळे सर्व घरांचे रंगकाम (गिलावा) हे लाल मातीने (जसे काही लाल गेरु) रंगवल्या जात असत. त्यावर पांढऱ्या चुन्याची नक्षी काढून (जणू ते कोकण वासीयांची वारला नक्षीच असावी) अशा पद्धतीत टिपक्यांची रांगोळी काढतात.
रक्षाबंधन किंवा गोकुळाष्टमीनंतर घराची सफाई करतात. त्यानंतर घरांना आतून रंग काम करणे. गणपतीची भिंतीवर चित्र काढून ठेवणे अशी कामे आठ दिवसापूर्वी करतात. गणेश चतुर्थीला अगदी चार दिवस राहिले की गणपतीच्या वर असणारी मंडपी (मांडी) स्वच्छ करून व्यवस्थीत घट्ट बांधली जाते. त्यानंतर तिला रंगीत कागदाने सजवून गणपतीचे आसन असलेला टेबल हे व्यवस्थित डिझाईन मकरांनी सजवून, लाइटिंग केली जाते. गणपतीचे आवडते मोदक नैवेद्यसाठी लागणारे, तांदळाचे पीठ दळून ठेवणे त्यानंतर विविध प्रकारच्या भाज्यांची तजबीज करणे सगळा बाजार भरणे या गोष्टी महिलाच करतात. यावेळी महिलांची फार गडबड असते. यात भर म्हणजे आवरणे हरितालीका पूजन करणे व पूर्ण दिवस उपवास करणे. असे असले तरी हा त्रास क्षीण कुठल्या कुठे निघून जातो.
अखेर तो गणरायांच्या आगमनाचा दिन उजाडतो. सकाळी विधिवत पूजा करून गणपतीची अकरा वाजेपर्यंत प्रति स्थापना केली जाते. त्यानंतर ब्राह्माणांच्या उपस्थितीत पूजा पाठ करतात. काही ठिकाणी गौरीपूजन पहिल्या दिवशी गणपती बरोबर गौरी येते आणि गणपतीबरोबरच जाते. अशीही प्रथा आहे. मालवण तालुक्यातील श्रावण चव्हाणवाडी येथील चव्हाण कुटुंबियांची गवर - गौरी (गणपतीच्या मातोश्री) या गणपती गजानना बरोबरच चतुर्थी दिवशी येते. व गणपती जेवढे दिवस राहील तेवढे दिवस गौरी माता राहत असते. आणि मग महिला वर्गाकडून तिची विधीवत पुजा होते. २१ मोदकांचा नैवेद्य बाप्पांना दिला जातो. आणि वर्षभर जेवणाचा जो आस्वाद घेतलेला नसतो तोच स्वाद आणि समाधान या दिवशीच्या दुपारच्या भरपोट भोजनातुन मिळतो. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पूजा करून आरती केली जाते. वाडीतील सगळी मंडळी आनंदाने एकामेकांच्या घरी जाऊन भजन व आरती करतात. काही अडचणीमुळे, दीड दिवसांनी गणपती जातात, त्यांच्या घरी रात्री अकरा वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम असतो. अकरा दिवस लहान थोर सगळी माणसं एक आगळा वेगळा आनंदोत्सवच साजरा करत असतात. एकंदरीत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान उत्साह आनंद ओसांडत असतो.
अशा या गणपती गजाननांचा पहिला दिवस जाऊन दुसरा तिसरा जात चौथा दिवस सुरु होतो. या दिवशी गौरी आवाहन दिन. लोकांच्या घरी असलेल्या प्रथेनुसार ते गौरी आव्हान पूजन व विसर्जन असे चौथ्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी हे कार्यक्रम आयोजित केले जाते हा सगळा उत्सव आनंद चाकरमानी पै पाहुणे यांच्या आगमनाने एक वेगळाच उत्साह प्रत्येक गावागावात आणि घरोघरी वाढलेला असतो. यावेळी भावबंधातील भांडणे द्वेश राग हा कुठल्या कुठे पळून गेलेला असतो. आणि सगळे गुण्यागोविंदाने एकाच चुलीवर रांधलेल स्वयंपाक गणपती गजानन च्या समोर बसून ग्रहण करत असतात. आणि आनंदाने आपल्या कुटुंबाची ताकद समाजाला दाखवत असतात. असा आनंद असतो. जन्मोजन्मी आयुष्यभर पुरणारा असा एक वर्षाचा, वर्षातून एकदा या कोकणी माणसाला मिळत असतो. याची प्रचिती घेण्यासाठी आपल्याला कोकणातच यावं लागेल अशी कोकणस्थ आग्रहाने येवा. कोकण आपलाच असा असे म्हणताना दिसतात.
असे अकरा दिवस म्हणजेच अनंत चतुर्थी दिवशी गणपती गजानना वडे, भात आणि सांबार असे प्रकारच्या पंचपंक्वान्न नैवेद्य दिला जातो. आणि संध्याकाळी चार वाजता आरतीने गणपती गणेशोत्सवाच्या सांगते कडे वाटचाल सुरू होते. मग सर्वांच्या गणपतीची आरती होते आणि गणपतीची वाजत मिरवणूक नदीकिनारी घेऊन जातात. गणपती गजाननला उत्साहात आणतात. विसर्जनाला मात्र प्रत्येकाचे डोळे पाणवतात. त्यानंतर भक्तगणांनी आणलेला प्रसाद ग्रहण करून दबक्याच पावलांनी भक्त घरी परततात. त्या दिवशी मात्र घरघरातल्या प्रत्येक सदस्याला गणरायाच्या ११ दिवसांच्या आठवणींने घर नकोसे वाटते. फुगड्या, आरती, भजन डबलबारी यांमुळे समाधान, आनंद मात्र वर्षभर पूरणारा असा असतो.
शब्दांकन : ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत,
पोयरे (मुंबई) व गणेश चव्हाण, श्रावण मालवण