रोटरीच्या “सायकल दान मोहिम” मुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आले हसू


दिवा (आरती मुळीक परब) : आदिवासी पाड्यांवर लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. याची जाणीव रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेच्या पदाधिकाऱ्यांना झाल्यामुळे त्यांनी सायकल दान मोहिम या मोहिमेतून जुन्या सायकली दुरुस्त करून त्या आदिवासी मुलांना दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले.

शहरातील मुले ही रेल्वेने, खाजगी बसने, रिक्षा अथवा शाळेत चालतच जातात. अलिबाग मुरुड येथील काजुवाडी बोईघर मधील मुलांना शाळेसाठी फार पायपीट करावी लागायची. ही बाब लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेच्या पदाधिकाऱ्यांनी ही पायपीट कशी थांबेल यासाठी दिवेकरांना सायकल दान मोहिमेत सामील होऊन स्वतःच्या मुलांच्या जुन्या वापरात नसलेल्या चांगल्या सायकली दान देण्यास आवाहन केले. या रोटरीच्या आवाहनाला दिवा, डोंबीवलीतून चांगला प्रतिसाद मिळत एकूण १६ सायकली जमा झाल्या. नंतर त्या जमा झालेल्या सायकली क्लबच्या वतीने दुरुस्त करून अलिबाग मुरुड येथील काजुवाडी बोईघर येथील अदिवासी पाड्यातील मुलींना, मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाकरिता उपलब्ध करण्यात आल्या.

त्या प्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून क्लबच्या वतीने केलेल्या कामाचे चीज झाले, अशा प्रकारची भावना रोटरी क्लब ऑफ दिवाचे अध्यक्ष हर्षद भगत व्यक्त केली. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ दिवाचे अध्यक्ष हर्षद भगत, माजी अध्यक्ष अभिषेक ठाकूर, स्वप्निल गायकर, साईनाथ म्हात्रे, अंकुर मुंडे, किशोर पाटील, वैष्णव पाटील व बोईघर गावचे सरपंच काशीनाथ वाघमारे व सदस्य उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post