डोंबिवली ( शंकर जाधव ) : गेली अनेक वर्ष डोंबिवली पूर्वेकडील भाजी मार्केट परिसरात कै. शंकर मित्र ममंडळ आणि शिवगर्जना भाजीफळे विक्रेता संघाच्यावतीने कृष्ण जनाष्ठमी व दहीकाला उत्सव साजरा केला जातो. समाजिक उद्देश समोर ठेवून या मंडळाने आजवर अनेक उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी मात्र या मंडळाने वेगळा उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाला १० हजार रुपयांचा धनादेश देणार असल्याचे अध्यक्ष भालचंद्र ( भाऊ ) पाटील आणि उपाध्यक्ष अनंता पाटील यांनी सांगितले.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अजूनपर्यंत डोंबिवली शहरातील रस्त्यावर खड्डे बुजविण्यात न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पावसाचे आगमन झाल्याने पालिका प्रशासनाला खड्डे बुजविण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन मात्र पावसाळा कमी होण्याची वाट पाहत आहेत. रस्त्यातील खड्डयांमुळे वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
