वसईकरांच्या पाण्यात ‘एमएमआरडीए`चा खोडा!
वसई : विरार- वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने पत्रव्यवहार करूनही वाढीव ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणी देण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वेळकाढू धोरण अवलंबत आहे. हे पाणी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी पालघर जिल्हा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने सोमवार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजता एमएमआरडीएच्या मुंबई-वांद्रे येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शिवेसेना नेते आदित्य ठाकरे व आमदार सुनील शिंदे करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे. या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीसह वसई-विरार शहरातील सामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहितीही शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने देण्यात आली आहे.
वसई-विरार महापालिकेची सध्याची लोकसंख्या अंदाजे२४ लाख इतकी आहे. या लोकसंख्येची पाण्याची मागणी ३७२ दशलक्ष लिटर इतकी आहे. वसई-विरार महापालिकेला सर्व स्रोतांतून मिळून २३० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असून, १४२ दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तूट भासत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सूर्या (४०३ दशलक्ष लिटर) पाणीपुरवठा योजनेतून महापालिका क्षेत्रात १६५ दशलक्ष लिटर पाणी आणण्याकरता जलवाहिनी अंथरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तूर्त ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणी काशिद-कोपर येथून उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण झालेली आहे. सदरचे वाढीव पाणी जुलैअखेर वसई-विरार महापालिकेस उपलब्ध करून देणे अपेक्षित होते; परंतु मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या माध्यमातून वाढीव पाणी उपलब्ध करून देण्यास जाणीवपूर्वक विलंब होत आहे.
शहराची पाण्याची वाढती मागणी व त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे महापालिकेस नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वसई-विरार महापालिकेने सातत्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)सोबत पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्रव्यवहाराला आवश्यक तो प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परिणामी वसई-विरारकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान; शहरवासीयांची गरज लक्षात घेता; काशिद-कोपर येथून देण्यात येणारे ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. या मागणीसाठी शिवसेनेच्या माध्यमातून याआधी दोन वेळा पालिका मुख्यालयासमोर आंदोलनेही करण्यात आलेली होती. त्यानंतरही या कामाला गती मिळालेली नाही. त्यात आता काशिद-कोपर येथून उपलब्ध होऊ शकणारे ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणीदेखील वसई-विरारकरांना देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. या पाण्यात महापालिकेऐवजी एमएमआडीएच खोडा घालत आहे. त्यामुळेच पालघर जिल्हा शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या माध्यमातून एमएमआरडीएविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, दिलीप चेंदवणकर महिला जिल्हा संघटक किरणताई चेंदवणकर, तालुका प्रमुख राजाराम बाबर, स्वप्नील बांदेकर, काकासाहेब मोटे, जिल्हा सचिव प्रकाश गावडे, उपतालुका प्रमुख ॲड. अनिल चव्हाण, जिल्हा संघटक नम्रता वैती-ठाकूर, कल्याणी पाटील,जिल्हा सचिव किशोर नाना पाटील, वसई शहर प्रमुख प्रथमेश राऊत, युवासेना सहसचिव, भुमिष सावे, जिल्हाधिकारी सिद्धेश जोगळे, अतुल मोटे, भुषण वैती, प्रवीण गावडे,भक्ती दांडेकर, नालासोपारा शहर प्रमुख प्रदीप सावंत, संतोष टेंबुलकर, नायगाव शहर प्रमुख संजय गुरव, विरार शहर प्रमुख उदय जाधव व अन्य शिवसैनिक यांच्या नेतृत्वात आणि सामान्य जनतेच्या उत्स्फूर्त सहभागात हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे
.jpeg)