देशाचे पहिले सौर मिशनचे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटा: चंद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग केल्यानंतर इस्रोने आता मिशन सूर्य हाती घेतले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची ही पहिलीच अंतराळ मोहीम इस्रोकडून राबवण्यात येणार आहे. देशाचे पहिले सौर मिशन 'आदित्य एल १' चे शनिवारी सकाळी ११.५० ला यशस्वी प्रक्षेपण झाले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून 'आदित्य एल १' इस्रोच्या 'पीएसएलव्ही सी५७’ या शक्तिशाली प्रक्षेपकाद्वारे अवकाशात झेपावले. आता ते 'लॅग्रेंज पॉइंट १' या ठिकाणाहून सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे १५ लक्ष किमी अंतरावर स्थित आहे. या यानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.
सूर्याच्या एल१ कक्षेत हे यान स्थापित केले जाणार आहे. येथून हे यान सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी तब्बल १२५ दिवसांचा प्रवास हे आदित्य एल १ करणार आहे.
आदित्य एल१’ प्रक्षेपणाची तयारी पूर्ण करण्यात आली होती. चंद्रयाणाप्रमाणे या मोहिमेकडे सुद्धा संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. तब्बल ३७००० सेकंदात या प्रक्षेपकाणे आपला प्रवास पूर्ण करत आदित्य एल १ला सूर्याच्या प्रवासाच्या दिशेने पाठवले. यानाचे प्रथम, द्वितीय आणि तिसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला असून आदित्य १ आता त्याच्या सूर्याच्या दिशेने पुढे जाणार आहे.
आदित्य यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू होईल.
चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. हा संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.