आंदोलकांनी ४ बसेसह अनेक वाहने पेटवली
लाठीचार्जचा आदेश गृहमंत्र्यांनीच दिला असावा - शरद पवार
जालना: जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे-पाटील आणि शेकडो मराठा बांधव उपोषणाला बसले होते. परंतु, सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिसांनी लाठीचार्जही केला. दगडफेक सुरू झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे सांगितले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याचीही माहिती आहे. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, या लाठीचार्जनंतर जालन्यात संतप्त जमावाने बसेसची जाळपोळ केली. यामुळे जालन्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. या घटनेचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध केला. 'महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे, तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असावेत, अशी घणाघाती टीका शरद पवारांनी केली आहे.
जालन्यात झालेल्या या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी सांगितले
जालन्यात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली. आंदोलकांनी काही वाहनांना आग लावली तसेच महामार्गावर दगडफेक देखील झाली. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, लाठीचार्जमध्ये काही महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या चार दिवसापासून म्हणजे मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० कार्यकर्ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्णाण झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने वादावादी झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
जालना येथे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मी स्वतः उपोषणकर्त्यासोबत बोललो होतो. पोलीस अधिकाऱ्यांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले होते. मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या हेतूने पोलीस त्यांच्या जवळ जात असताना प्रकार घडला. मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे. आरक्षण टिकावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज होता कामा नये, अशी भूमिका सरकारची आहे. सर्वांनी शांतता राखावी. शांतता प्रस्थापित करण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांनी केले पाहिज.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
जालन्यातील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. तेथील उपोषणकर्त्यांशी स्वत:हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीरतेने काम करत आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे एकादिवसात सुटणारा प्रश्न नाही. तो सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालले असल्याचं उपोषणकर्त्यांना सांगितले होते. मात्र, आंदोलक उपोषण सोडवण्यासाठी तयार नसल्याने त्यांची तब्येत खालावत होती. कोणत्याही उपोषकर्त्याची तब्येत खालावत असेल, तर रूग्णालयात दाखल करण्यात यावे, ही सरकारची जबाबदारी आहे. उपोषकर्त्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी गुरूवारी प्रयत्न करण्यात आले. पण, उपोषकर्त्यांना उद्या या सांगितले. त्यानुसार पोलीस गेल्यानंतर त्यांना घेरून दगडफेक करण्यात आली. यात अधिकाऱ्यांसह १२ पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर लाठीचार्ज झाला आहे.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
मराठा आरक्षणासाठीचे हे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रूधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडीओंमधून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येत आहे.
अशोक चव्हाण, काँग्रेस नेते
एक आदेश येतो आणि या मराठा बांधवांवर पोलीस अमानुष लाठीहल्ला करतात. आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे. राज्यातील एखादा समाज शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवत असताना,त्यांच्यावर असा अमानुष लाठीचार्ज करणे,हे सरकारला शोभत नाही.केंद्रात आणि राज्यात सरकार असताना देखील मराठा बांधवांना,आरक्षण देण्याची हमी देण्याचं सौजन्य सुद्धा हे सरकार दाखवत नाही.उलट त्यांच्यावरच लाठीचार्ज करून या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत.मराठा समाजावर झालेल्या या अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध.
जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी