बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांचा कोर्टात दावा
नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपनिश्चिती प्रकरणी रविवारी राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीस उपस्थित राहण्यापासून बृजभूषण सिंह यांना एक दिवसाची सूट दिली आहे. दरम्यान, महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्याची एकही संधी बृजभूषण सिंह यांनी सोडली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरसे पुरावे असल्याचा युक्तिवाद देखील यावेळी दिल्ली पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजीत सिंग जसपाल यांच्यासमोर केला. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
एका महिला कुस्तीपटूच्या तक्रारीचा संदर्भ देत दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले, तजाकिस्तानमधील एका कार्यक्रमावेळी बृजभूषण यांनी तक्रारकर्त्या महिला कुस्तीपटूला खोलीत बोलावले आणि जबदरस्तीने तिला मिठी मारली. ताजिकिस्तानमधील आशियाई चॅम्पियनशिप दरम्यान बृजभूषण सिंह यांनी परवानगीशिवाय महिला कुस्तीपटूचा शर्ट उचलला आणि तिच्या पोटाला अनुचित रित्या स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर या घटना भारताबाहेर जरी घडल्या असल्या तरी त्यांच्या या प्रकरणाशी संबंध असल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी यावेळी केला आहे.
महिलेने विरोध केल्यावर, वडिलांप्रमाणे ही मिठी मारल्याचे बृजभूषण सिंह यांनी म्हटले. बृजभूषण सिंह यांना आपण काय करतोय, याची माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बृजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. त्याचपार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर- मंतर येथे आंदोलन देखील केले होते. तर त्यांच्या आरोपांवर योग्य ती कारवाई नक्की करण्यात येईल असे आश्वासन सरकारकडून कुस्तीपटूंना देण्यात आले होते. पण अद्यापही बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात ते दोषी ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Tags
क्रीडा