ढिगाऱ्यात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील जूना आयरे रोड येथील आदिनारायण तळमजला अधिक तीन मजली इमारत शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी तर एक जण ढिगाऱ्याखाली आहे. या इमारतीत सात ते आठ खोल्या होत्या. बहुतांश जणांनी रुम खाली केल्या होत्या. पण दोघेजण त्याठिकाणी वास्तव करीत होते. या ठिकाणी शिवसेना, भाजप व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मदतीसाठी आले.
डोंबिवली पूर्वेकडील जूना आयरे रोड येथील आदिनारायण तळमजला अधिक तीन मजली इमारत होती. ५० वर्षापूर्वी लोड बेअरिंग पध्दतीने बांधलेल्या या इमारतीत एकूण ४० कुटुंब राहत होती. या इमारतीत सात ते आठ खोल्या होत्या. इतर रहिवासी खोल्या खाली करून गेले होते मात्र दोन जण त्यामध्ये वास्तव्यास होते. अरविंद संभाजी भाटकर (७०) आणि दीप्ती लोढिया (५४) असे ढिगाऱ्याखाली अडकलेली होती. यातील दीप्ती लोढिया यांना काही वेळानंतर बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आले. यामध्ये मात्र सुनील लोढिया (५७) नामक व्यक्तिला ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. मात्र, काही वेळातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना कालच (गुरुवारी) दुसरीकडे स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली होती. काही कुटुंब या इमारतीमधील घरे सोडून यापूर्वीच अन्यत्र राहण्यास गेली आहेत. काही कुटुंबांना शुक्रवारी सकाळी घराबाहेर काढण्यात आले. तर या इमारतीमध्ये अरविंद संभाजी भाटकर (७०) हे एकटेच राहतात. ते बिछान्याला खिळून आहेत. सुनील बिरझा लोढिया (५७) आणि दीप्ती सुनील लोढिया (५४) हे दाम्पत्य सुद्धा इमारतीत राहत होते. दीप्ती या मानसिक दृष्टया आजारी आहेत. भाटकर आणि लोढाया हे दोन्ही कुटुंब घराबाहेर पडण्यास कर्मचाऱ्यांना नकार देत होते.
