ठाणे : बाळकुम ( balkum) परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन (runwal aayrin) या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी निपुण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी एक कामगाराला खासगी निपुण रुग्णालयात हलवण्यात आले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.