कल्याण ( शंकर जाधव ) : काही महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये अंधाधुंद गोळीबारात १५ ते २० राऊंड फायर करण्यात आले होते. या प्रकरणात फडके यांच्यासह ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले झाल्यावर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. गोळीबार प्रकरणी ३२ जणांवर मोक्का लावण्यात आला होता. यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा देखील समावेश होता. मात्र मोक्का दाखल होऊनही कुणाल पाटील यांच्यासह अन्य काही आरोपींना अटक होत नसल्याने तसेच ते मोक्क्याचे आरोपी ठिकठिकाणी मोकाट फिरत असल्याचे राहुल पाटिल यांनी पत्रकारांना सांगितले.
राहुल पाटील यांनी गुरुवारी उपायुक्त कार्यालयाबाहेरच आपण उपोषण करण्याच्या इशारा देखील दिला होता. मात्र गुरुवारी दुपारी मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
राहुल पाटील यांच्या समर्थनार्थ महिलांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. जर अटक झाली नाही तर कायदेशीर मार्गानी आंदोलन करणार असल्याचे इशाराही यावेळी राहुल पाटील यांनी दिला.

