पालिका प्रशासन फक्त नोटीसा देण्यास दंग
राजकीय नेते स्वतःची पोळी भाजून घेण्यात व्यस्त
डोंबिवली (शंकर जाधव) : ठाणे जवळील डोंबिवली शहराचा विकास हळूहळू सुरू झाला. दळणवळणाची साधने, चाकरमानी, व्यवसाय यामुळे शहराच्या विकासाने वेग धरला. मुंबईतील नागरिक डोंबिवली शहरात राहण्यास येत असल्याने डोंबिवली शहरात भूमिपुत्रांनी इमारती बांधल्या. ४०-५० वर्षांपूर्वी या शहरात पगडी पद्धतीने राहण्यास घरे दिली जात होती. आता या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून ती दुरुस्ती अथवा जमीनदोस्त करणे आवश्यक असते. पण इमारत मालक व भाडेकरू यांच्यात एकमत होत नसल्याने रहिवासांचे जीव टांगणीला लागले असतात. मात्र आजपर्यंत यातील मधला मार्ग निघालेला नाही. यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संतोष केणे यांच्या पुढाकाराने घरमालक व भाडेकरू यांची बैठक पार पडली होती. एवढे करूनही अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचा प्रश्न व या इमारतीत रहिवासांच्या पूर्णवसनाचा प्रश्न जोवर सुटत नाही,
तोवर जीव मुठीत घेऊन नागरिक डोंबिवलीतच राहणार. डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडवरील आदिनारायन भुवन इमारत कोसळणे, असो की डोंबिवली पश्चिमेकडील नागुबाई निवास इमारत असो अशा अनेक धोकादायक इमारती अचानक पडण्याची शक्यता वर्तवलेली असताना देखील पालिका प्रशासनाला घरे खाली करण्यास अथवा नोटिसा बजवण्यात विलंब का होत असतो या प्रश्नाचे उत्तर नागरिकांना कधी मिळणार याची नागरिक वाट पाहत बसला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत १६८ अतिधोकादायक व धोकादायक इमारती आहेत. यातील अनेक इमारती निष्काशीत करण्यात आल्या असून उर्वरित इमारतींतील रहिवाशांना घर रिकामी करण्याच्या नोटिसा पालिका प्रशासनानकडून बजावण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना प्रशासनाकडून भोगवटाधात्रक प्रमाणपत्र दिले जाते अशी माहिती पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी बोलताना दिली. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २०२० पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. अडीच वर्षे उलटून गेली पण पालिका हद्दीतील अतिधोकायक आणि धोकादायक इमारती रिकामी करून पडण्यास प्रशासनाला वेळ मिळत नाही. शुक्रवारी न्यू आयरे रोडवरील आदिनारायन भुवन इमारत अचानक पडल्याने पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे घटनास्थळी आले होते. त्यावेळीही आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना अशा इमारतींना रिकामे करण्याचे काम सुरू असल्याचे संगितले.
वास्तविक जोवर पगडी पध्दतीतील धोकादायक इमारतींवर कारवाई केली जात नाही. त्याचबरोबर इमारतींचे मालक व भाडेकरू यांच्यातील वाद जोपर्यंत संपुष्टात येणार नाही, तोपर्यंत इमारती कोसळण्याच्या घटनांना आळा बसणार नाही.
उल्हासनगरमधील पॉलिसी डोंबिवलीत राबवावी
न्यू आयरे गावात आदिनारायण भुवन या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आली. घटनास्थळी मनसे आमदार प्रमोद (राजू पाटील) यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, एखाद्या बिल्डरच्या माध्यमातून सोयीसुविधा देऊन नागरिकांना कशी घर मिळतील, याचा विचार करावा. कल्याण आणि डोंबिवली शहरातील अशा जून्या धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर व्यतिरिक्त आणखी कोणतीतरी नवीन योजना आणावी, उल्हासनगरला ज्याप्रमाणे राज्य सरकारने पॉलिसी आणली, तशाच प्रकारची पॉलिसी याही शहरातील इमारतींसाठी वापरली जावी.
मुबंईच्या धर्तीवर वाढीव एफएसआयचा विचार केल्यास हा घरमालक व भाडेकरू यांच्यातील हा वाद संपेल. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी यावर तोडगा काढला होता.आता आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विंनती आहे की कल्याण- डोंबिवली शहरातील धोकादायक व अतिधोकायक इमारतींचा प्रश्न सोडवावा.संतोष केणे, पदाधिकारी काँग्रेस
Tags
महाराष्ट्र
