१६ वर्षांनी पुन्हा तोच चेहरा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मनसेच्या आंदोलनात सक्रिय भाग घेणारे कट्टर मनसैनिक राहुल कामत यांची डोंबिवली शहर अध्यक्ष पदी राहुल कामत नियुक्ती करण्यात आली आहे. कामत यांना शहर अध्यक्षपद दिल्याने पक्षात अनेकांना पद दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेचे मावळते अध्यक्ष मनोज घरत यांच्या खांद्यावर कोणती जबाबदारी टाकली जाईल, हे अद्याप गुलदत्यात आहे. राहुल कामत हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते विद्यार्थी सेनेचे काम करीत होते. मनसेचे पहिले शहराध्यक्ष पदांची माळ देखील राहूल कामत यांच्या गळ्य़ात पडली होती. २००६ ते २००७ या कालवधीत त्यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर सांभाळली होती. विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून २००५ ते २०१३ या कालावधीत काम पाहिले आहे. मनसे जिल्हा संघटक पदांवर २०१८ ते आजतागायत काम पाहत होते.याबाबत कामत यांना विचारले असता ते म्हणाले, मला डोंबिवली शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळेल असे वाटले नव्हते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकून जो विश्वास दाखविला आहे याबद्दल त्यांचे आभार मानतो.होऊ घातलेल्या निवडणूका पाहता सर्व प्रथम पक्षांची बांधणी करणार आहे. पक्षाचा खासदार, आमदार आणि महापौर कसा निवडून यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांवर आता कोणती जबाबदारी पडेल याच्या विचारता आहेत.तसेच मनसेच्या माजी नगरसेवकांना आणखी जोमाने काम करा असे पक्ष अध्यक्षांकडून सांगण्यात आल्याचे समजते.