मच्छीमारांवर जेलीफिशचे संकट

 


अलिबाग, (धनंजय कवठेकर) :  मासेमारी बंदीनंतर महिनाभरातच रायगड जिल्हयातील समुद्रात जेलीफिशचा वावर वाढला आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर होऊ लागला आहे. जेलीच्या भीतीने मच्छीमार मासेमारीपासून वंचित आहेत. पापलेट, सुरमई आदी मासळीच्या ऐन हंगामात बंदरावर हजारो बोटी गेल्या १५ दिवसांपासून किनारी उभ्या करण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. मासळीवर अवलंबून असलेल्या कामगारांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यामध्ये यांत्रिकी व विनायांत्रिकी अशा एकूण सुमारे पाच हजार बोटी आहेत. या बोटीद्वारे मच्छीमार मासेमारी करीत आहेत.

मासेमारी करण्यापासून मासळी बोटीतून काढणे, त्यातून मासळी निवडून काढणे, मासळी बाजारात विक्रीसाठी नेणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात. ऑक्टोबर महिन्यात सुरमई, पापलेट, रावस, कोळंबी ही मासळी मिळते. दिवाळीपर्यंत या मासळीचा हंगाम असतो. त्यामुळे मच्छीमार. मासेमारीच्या तयारीला असताना अचानक समुद्रात जेली फिशने थैमान घातले.

शरीरावर चिकटल्यास अंगाला खाज येत असल्याने मासेमारी करताना मच्छीमारांना अडथळे निर्माण होत आहेत. जेली फिशमुळे आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे. जेलीफिशचा समुद्रात वावर वाढल्याने मासळीही खोल समुद्रात पळून जाऊ लागली आहे. जेली फिशच्या भीतीने मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यास टाळले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बोटी किनारी लागून राहिल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

 गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात जेली फिश आली आहे. जेलीफिशच्या भीतीने मासेमारीला जाण्यास टाळले जात आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. असाच प्रकार राहिल्यास मच्छीमारांवर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची भीती वाटते आहे.

- डॉ. कैलास चौलकर, मच्छीमार नेते

Post a Comment

Previous Post Next Post