वावोशी येथे ७ मेंढ्या आणि २ शेळ्यांचा मृत्यू

 मेंढपाळ खंडू कोकरे यांच्यावर ओढवले संकट

 खालापूर- रायगड (विशेष प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदाही मेंढपाळ आपल्या कळपातील मेंढ्या घेऊन कोकणाकडे निघाले असतांना या मेंढपाळांच्या कळपातील मेंढ्या मरू लागल्याने मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे.मेंढपाळ खंडू कोकरे हा मेंढपाळ पूणे केडगाव चौफुले या ठिकाणचा असून याने आपल्या मेंढ्यांना अन्य लोकांच्या मेंढ्या बरोबर घेऊन राखण्यासाठी पूणे जिल्ह्यातून खोपोली शहरात चार दिवसांपूर्वी प्रवेश केला.त्याच्या कळपातील चार मेंढ्या ह्या चार दिवसांपूर्वी खोपोली येथे मुक्कामाच्या ठिकाणी मरण पावल्या.

कशानेतरी या मेंढ्या मेल्या असाव्यात असा समज कोकरे यांचा झाल्याने त्याने एवढे काही मनावर घेतले नाही. तेथून तो आपल्या कळपातील मेंढ्या घेऊन पुढे वावोशीकडे निघाला या दरम्यानच्या प्रवासाला त्याला तीन दिवस लागले तो काल संध्याकाळी वावोशी जवळील वनवठे येथे मुक्कामाला आला.रात्री सर्व मेंढ्या व्यवस्थित होत्या मात्र सकाळी यातील काही मेंढ्या आजारी पडल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्याने लगेच वावोशी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधला. तेथील डॉक्टर नेत्रा आस्वार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासणी करण्यास सुरुवात करेल पर्यंत यातील ७ मेंढ्या व २ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या.हे चित्र पाहून डॉ.नेत्रा आस्वार यांनी खालापूर तालुका पशुधन विकास अधिकारी रोहिणी गायकवाड यांच्याशी संपर्क करून तात्काळ अन्य डॉक्टरांची मदत मागवून उपचार करायला सुरुवात केली.या दरम्यान चार ते पाच मेंढ्या मृत पावल्या मात्र डॉक्टरांना ज्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले त्या मेंढ्या मात्र बचावल्याने कोकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मेंढ्या अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येने मरण पावल्याने खळबळ माजली.हे समजल्यावर खालापूर तालुका पशुधन विकास अधिकारी रोहिणी गायकवाड यांनी तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह वनवठे येथे प्रस्थान करून आजारी मेंढ्यांना उपचार करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्यांच्या समवेत डॉ.नेत्रा आस्वार, डॉ.कोकरे, डॉ.काळे, डॉ.राजेंद्र गायकवाड, सहाय्यक म्हापणकर यांच्यासह मदतीसाठी आलेले रासपचे कार्यकर्ते भगवान ढेबे,संपत ढेबे,विजय ढेबे, रविंद्र बोडेकर,अरूण मोरे यांच्या मदतीने आजारी मेंढ्यांना उपचार करून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले असता यातील काही मेंढ्या वाचल्याचे दिसून येत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post