मुंबई: अखिल भारतीय सरासरी किरकोळ कांद्याची किंमत ५७ टक्क्यांनी वाढल्यामुळे मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. अनेक ठिकाणी हे भाव जवळपास ६० रुपयांपर्यंत गेले आहेत. दिवाळीपर्यंत हा भाव जवळपास ८० रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. कांद्याचे भाव ऐन सणांच्या दिवसात वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट मात्र कोसळू लागले आहे. वाढलेल्या कांद्याच्या भावाला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातमुल्यात दुप्पट वाढ केली असून ती ८०० डॉलर प्रति टन (३१ डिसेंबरपर्यंत) इतकी केली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत ४७ रुपये प्रति किलोपर्यंत वाढली, जी वर्षापूर्वीच्या कालावधीत ३० रुपये प्रति किलो होती.
देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या बारा दिवसांमध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात ६० टक्के वाढ झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी २८७० रुपये मिळणारे बाजार भाव ५८६० रुपयांपर्यंत गेल्याने केंद्र सरकार खडबडून जागे होत नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा २५ रुपये किलो दराने बाजारात विक्री करण्याच्या निर्णय घेतला. याला २४ तास उलटत नाही तोच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढत कांद्याच्या निर्यात शुल्क दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ४०० डॉलरवरून ८०० डॉलर केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
कमी पुरवठ्यामुळे राष्ट्रीय राजधानीच्या किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ६५-८० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे ४०० सफाल रिटेल स्टोअर्स असलेली मदर डेअरी ६७ रुपये किलो दराने सैल कांदा विकत आहे. ई-कॉमर्स पोर्टल बिगबास्केट ६ रुपये प्रति किलो, तर ओटिपी ७० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
शुक्रवारी कांद्याचा भाव ४० रुपये/किलो होता, जो मागील वर्षीच्या काळात ३० रुपये/किलो होता. याबाबत ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, "आम्ही ऑगस्टच्या मध्यापासून बफर कांदे ऑफलोड करत आहोत आणि किमतीत आणखी वाढ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही किरकोळ विक्रीला गती देत आहोत."
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या राज्यांमध्ये किमतीत मोठी वाढ झाली आहे, अशा दोन्ही घाऊक आणि किरकोळ बाजारातील बफर स्टॉकमधून कांदा उतरवला जाणार आहे. ऑगस्टच्या मध्यापासून २२ राज्यांतून सुमारे १.७ लाख टन बफर कांदा वेगवेगळ्या ठिकाणी उतरवण्यात आला आहे.
किरकोळ बाजारात, बफर कांदा दोन सहकारी संस्था NCCF आणि NAFED आऊटलेट्स आणि वाहनांद्वारे २५ रुपये प्रति किलो या अनुदानित दराने ऑफलोड केला जात आहे. दिल्लीतही या अनुदानित दराने बफर कांदा विकला जात आहे.