डोंबिवली ( शंकर जाधव ) : मराठा आरक्षणाला मिळावे याकरता मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण केले होते. मात्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असे वारंवार सांगणाऱ्या ॲड गुणरत्न सदावर्ते याची मंगेश साबळेने गाडी फोडली. ही वार्ता वाऱ्यासारखी देशभर पसरली. साबळेने समाजासाठी उचललेल्या या पाऊलाबद्दल समाजाकडून कौतुक होत आहे. जामीन मिळाल्यानंतर साबळेचे डोंबिवलीत मराठा क्रांती मोर्च्यांचे स्थानिक नेते लक्ष्मण मिसाळ आणि कार्यकर्त्यांकडून जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी साबळे म्हणाले, गुणवर्ते हा वारंवार मराठा समाजाला डीवचण्याचा प्रयत्न करत आहे. मराठयांचा इतिहास विसरले का, हा मराठा समाज क्रांतीकारी समाज मावळ्याचा समाज आहे. हा गुणवर्ते समाजाला आव्हान करत आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असल्याने सरकारने याचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तर दसऱ्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ असे जाहीर आश्वसन दिल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता साबळे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करतो. पण ४० दिवसांपूर्वी आश्वासन दिले होते की आरक्षण देतो, जीआर काढता असे आश्वासन दिले होते. मात्र त्याच पुढे काय झालं? आता राजकीय भाषण व घोषणावर आमचा विश्वास नाही. मराठा समाजाला ठोस उत्तर हवे आहे.