राज ठाकरे यांची सरकारवर टीका
मुंबई: नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयातील अनेक रुग्णांचा औषधाच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्या घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून सरकारमधील तीन पक्ष सोडून संपूर्ण महाराष्ट्र आजारी आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडल्याचे सांगत राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जात असल्याचे कानावर आल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या मर्यादित नसून सर्वत्र हाच प्रकार सुरू आहे. सध्या राज्यात तीन तीन इंजिनचे सरकार असूनही राज्याचे आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नसल्याची टीका करत पण महाराष्ट्राचे काय?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
राज्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर असताना २०२४ मध्ये आपणच कसे सत्तेवर येऊ, यात सरकार व्यस्त आहे. सरकारचे संख्याबळ ठणठणीत असून, संपूर्ण महाराष्ट्र आजारी पडल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. सरकारने स्वतःचे आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचे आरोग्य कसे सुधारेल, याकडे अधिक लक्ष द्यावे,' असेही राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
.jpeg)