संत नामदेव पथ, रॉकेल डेपो आणि एकनाथ म्हात्रे नगर परिसरातील नागरिक नाराज
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीत जवळील २७ गावात अनेक वर्षांपासून पाणी टंचाई असताना आता ऐन दिवाळी सणात संत नामदेव पथ, रॉकेल डेपो आणि एकनाथ म्हात्रे नगर परिसरात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या गेल्या सहा महिन्यांपासून सतावीत असताना पालिका प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते.आजूबाजूस अनेक नवीन इमारती बनल्या असून पाणी वितरण व्यवस्थेत असमतोलपणा आल्याचे दिसते.त्यामुळे काही इमारतींना कमी दाबाने, काही इमारतींना जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या परिसरातील पाणी चोरी होत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार कारशोर पगारे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले होते.मात्र यावर पालिकेने कारवाई केली नसल्याचे पगारे यांनी सांगितले.त्यात परिसरात एका ठिकाणी एका पाण्याच्या लाईनमधून पाणी गळती होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता पाखले यांना यासंदर्भात पागरे यांनी विचारले असता त्यांनी सदर ठिकाणी पाण्याची लाईन चोरीची नाही असे सांगितले.
संत नामदेव पथ, रॉकेल डेपो आणि एकनाथ म्हात्रे नगर या परिसरातील नागरिकांना पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे.दिवाळी सणात ही समस्यां सुटली नाही तर पालिका कार्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.दरम्यान येथील शिवसेना पदाधिकारी अमोल पाटील यांनी याचा पाठपुरावा करून इमारतींना पाणी टँकर मिळवून दिला.

