डोंबिवली ( शंकर जाधव ) : परवानगी न घेता झाडांची कत्तल करणाऱ्या इसमाविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण मित्र किरण शिंदे यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यावरण बदलाचा धोका असल्याने शिंदे यांनी ५ जून २०१५ रोजी 'मिशन हिरवीगार डोबिवली' हा वृक्ष रोपणाचा कार्यक्रम सुरू केला होता. त्या अंतर्गत जेथे योग्य जागा दिसेल आणि कोणालाही अडथळा होणार नाही असे पाहून रस्त्याच्या कडेला काही रोपाची लागवड केली होती. बदाम, पिंपळ ही दोन रोपटी पेंढारकर कॉलेज समोरील रोटरी क्लबच्या लगतच्या सार्वजनिक जागेवर लावली होती. ही झाडे १४ ते १५ फूट वाढली होती. या झाडावर नैसर्गिक जैवविविधता सुध्दा वास्तव्यास होती. तसेच बदामाच्या झाडाला बदाम लागली होती.
मागील अनेक दिवसांपासुन डोबिवली येथील घरडा सर्कल ते पेंढारकर महाविद्यालय समोरील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि फुटपाथ बांधण्याचे काम सुरू आहे. शिंदे झाडांना अनेकदा पाहण्यासाठी, त्यांची निगा राखण्यासाठी येत असत. २० ऑक्टोबर रोजी शिंदे हे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जात असताना पाहिले की त्यांनी लावलेले पिंपळ आणि बदाम तसेच रस्त्यालगतची इतर झाडे मुळापासून तोडून टाकण्यात आली आहेत. हे पाहून शिंदे यांना धक्का बसला. शिंदे यांनी याची माहिती काढली असता सदर ठिकाणी फुटपाथचे बांधकाम करणाऱ्या कामगारानेच सांगितले की,ठेकेदार आप्पा पवार आणि इतर लोकांनी या झाडाची कत्तल केली आहे.
याबाबत शिंदे म्हणाले, झाडे तोडायची असल्यास रितसर परवानगी घ्यावी लागते. विना परवानगी झाडे तोडल्यास गुन्हा दाखल होतो. स्वतःच्या मालकीची सुध्दा झाडे विनापरवानगी तोडता येत नाहीत. बेकायदेपीर वृक्ष तोडीसंदर्भात कल्याण डोबिवली महानगरपालिका आयुक्त, वृक्ष अधिकारी, उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग (केडीएमसी) ययांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु एक महिना उलटूनही या विभागाकडून दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून पर्यावर मित्र या नात्याने सदर घटनेबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.


