ठाण्यातील (MG moters) एमजी मोटर्सच्या शोरूमला काळं फासल
ठाणे : दुकानांवर मराठी फलक लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. शनिवारी मुदत संपल्यानंतर रविवारी (MNS) मनसैनिकाकडून खळखट्याक आंदोलन सुरू झाल्याचे चित्र ठाण्यात पहावयास मिळाले. मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेने आक्रमक होत काळे फासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.
राज्यातील सर्व दुकाने तसेच विविध आस्थापनांवर मराठी देवनागरी भाषेत नामफलक लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या साठी २५ नोव्हेंबर ही तारीख शेवटी होती. ही मुदत संपली आहे. मराठी पाट्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेत ठाण्यात एमजी मोटर्स शोरुमला काळे फासले. मनसेचे पदाधिकारी स्वप्निल महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील आस्थापनावरील इंग्रजी भाषेतील पाट्या मराठी भाषेत केल्या नाही तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसैनिक स्वप्निल महिंद्रकर यांनी दिला आहे.
अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केटमधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. तर काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी दहिसरमध्ये दुकानावरील इंग्रजी फलक फोडला. दिलेली डेडलाइन संपल्यानंतर रविवारी पहाटे मनसेने काही दुकानावरील इंग्रजीत लिहिलेल्या दुकानाच्या पाट्यांची तोडफोड केली. या इंग्रजी पाट्यांवर काळे फासले.
दरम्यान, मंत्री दीपक केसकर यांनी मनसेच्या या आंदोलनावर गंभीर इशारा दिला आहे. दीपक केसकर म्हणाले, दुकानांना मराठी पाट्या बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली असून ज्यांनी पाट्या लावल्या नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे केसकर म्हणाले.