मल्लखांबपटू पुरूषोत्तम सावंत यांचे निधन

डोंबिवली ( शंकर जाधव ) : भारताच्या मल्लखांब या व्यायामप्रकाराची युरोपला ओळख करून देणारे कल्याण नमस्कार मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष पुरूषोत्तम (बजरंग) सावंत यांचे बुधवार  २२ नोव्हेंबर रोजी कल्याण येथे ह्रदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

    तरुण वयातच युरोपीय लोकांना मल्लखांबाचे शिक्षण देण्यासाठी ते जर्मनीला गेले होते. अशा प्रकारे परदेशात भारतीय शिक्षण देण्यासाठी गेलेले ते कल्याणातील पहिलेच क्रिडापटू होते.मल्लखांब तज्ञ ते होतेच त्याचबरोबर मानवी शरीरशास्त्राची त्यांना योग्य माहिती होती. त्यामुळे केवळ हाताने योग्य ठिकाणी मसाज करून ते शरीरातील नसांचे आजार बरे करीत असत. त्यांच्या बोटांत जादू होती. त्यांच्या ज्ञानाचा फायदा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर तसेच महाराष्ट्रातील अनेकांनी घेतला व शस्रक्रियेविना आजारांवर विजय मिळविला. सूर्य नमस्कारांचा प्रचार करणाऱ्या नमस्कार मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. नमस्कार मंडळाच्या माध्यमातून भारतीय व्यायाम प्रकारांबरोबरच, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव अशा विविध स्पर्धांचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाने झाले होते. मसाज मधील त्यांचे कौशल्य त्यांची दोन्ही मुले प्रशांत व राजेंद्र यांनी शिकून घेतली असून सर्व कुटुंब कल्याणकरांची अव्याहतपणे सेवा करीत आहे.

    कै. पुरूषोत्तम सावंत यांच्यावर आधारवाडी स्मशानभूमीत गुरूवार   २३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. तेंव्हा माजी आमदार नरेंद्र पवार, नमस्कार मंडळाचे पदाधिकारी अनिल कुलकर्णी, प्रकाश गद्रे, जनता सहकारी बँकेचे सुरेश पटवर्धन, कल्याण गायन समाजाचे प्रशांत दांडेकर, रा.स्व.संघाचे अनेक स्वयंसेवक, कल्याणातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post