ठाणे परिवहनची अनोखी शक्कल
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या सॅटिसवरील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे परिवहन सेवेने वेगळी शक्कल लढवण्यात आली आहे. शास्त्री नगर, शिवाई नगर, गावंड बाग आणि उपवन या मार्गावर जाणाऱ्या परिवहनच्या बसेस २५ नोव्हेंबरपासून सॅटिस ऐवजी आता गावंदेवी परिसरातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावर जाणाऱ्या नागरिकांची सॅटिसवर होणारी गर्दी कमी होणार असून या मार्गावरील बसेसचा मार्ग देखील सुकर होणार असल्याचा दावा परिवहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र परिवहनच्या या निर्णयावर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचबरोबर इतर बसेस कायम राखत फक्त उपवनकडे जाणाऱ्या बसेसचा मार्ग वळविल्याने परिवहन दुजाभाव करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी सॅटिसची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे परिवहनच्या जवळपास ८० मार्गांवरील बसेस या सॅटिसवरूनच सुटतात. सॅटिसवर दररोज २०० पेक्षा अधिक बस येजा करत असून विशेष करून सकाळी आणि संध्याकाळी या परिसरात नागरिकांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या असतात.
शास्त्री नगर, शिवाई नगर गावंड बाग आणि उपवन या मार्गावर जाणाऱ्या बसेस गोखले रोड या ठिकाणी आल्यावर जवळपास अर्धा किमी बसेसच्या रांगा लागतात. सहा ते सात वर्षांपूर्वी या मार्गावरील बसेस गावंदेवी परिसरातूनच सोडण्यात येत होत्या अशी माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या बसेस पुन्हा गावंदेवीमधूनच सोडवण्यात याव्या अशा मागणीचे पत्र देखील काही प्रवाशांकडून परिवहन प्रशासनाला प्राप्त झाले असल्याचे बेहेरे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे गावंदेवी येथील परिसर काँक्रीट करण्यात आला असून या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी हा बदल महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे येत्या २५ नोव्हेंबरपासून या मार्गावरील सर्व बसेस या सॅटिस ऐवजी गावंदेवीमधून सुटणार असून याची माहिती देणारा बोर्ड देखील सॅटिसवर लावण्यात असल्याचे बेहेरे यांनी सांगितले.
याच सॅटिसवरून शास्त्री नगर, शिवाई नगर गावंड बाग आणि उपवन या मार्गावर जाणाऱ्या बसेस देखील सुटतात. या मार्गावर देखील परिवहनच्या ५० पेक्षा अधिक फेऱ्या होतात. त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. सॅटिसवरील गर्दी कमी करण्यासाठी या मार्गावरील बसेस सॅटिस ऐवजी गावंदेवीमधून सोडण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
परिवहनच्या कारभारावर शंका
सॅटिस ब्रिजवर सगळ्या मार्गावरील बसेस सोडल्या जातात. त्यात उपवनकडे जाणाऱ्या बसेसचा देखील समावेश आहे. मात्र इतर बसेसचा मार्ग वगळता फक्त उपवनकडे जाणाऱ्या बसेसचा मार्ग वळविल्याने नागरिकांनी आश्चर्य आणि शंका उपस्थित केली आहे. गावदेवी येथे शिवाई नगर, शास्त्री नगर येथे जाणाऱ्या शेअरिंग रिक्षस्टॅंड आहे. त्याठिकाणी संख्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिक्षाचालकांमध्ये संताप
गावदेवी येथे खोपट तसेच शिवाई नगर, शास्त्री नगर येथे जाणाऱ्या शेअरिंग रिक्षास्टॅंड आहे. त्याचबरोबर याच मार्गावरून ठाणे परिवहनच्या बसेस ठाणे स्टेशनकडे जात असतात. त्यामुळे मोठ्या गाड्यांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ठाणे स्टेशन ते गावदेवी यांच्यातील अंतर फार असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. परिवहन आणि रिक्षाचालक यांच्या वादात नागरिकांचा बळी देत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


