शीळ - दिवा रस्त्याच्या कडेला बनतेय नवीन डम्पिंग ग्राऊंड

 

खाडीकिनारी येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या कोणाच्या?

दिवा, (आरती मुळीक परब) :  शीळ- दिवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकून नवीन डम्पिंग ग्राउंड सुरु करण्यात आल्याची चर्चा दिव्यात रंगली आहे. दिवा खाडी किनारी दररोज कचऱ्याच्या गाड्यांची वर्दळ वाढलेली दिसून येत असून रस्त्याच्या कडेला आणि खाडी किनारी या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. मात्र या गाड्या नक्की कोणामार्फत सुरु करण्यात आल्या आहेत याची माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र या परिसरात पुन्हा कचरा टाकण्यास नव्या विरोधाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यात डम्पिंग बंद झाल्यानंतर डायघर मध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी सुरु करण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाच्या कामाला वेळ जाणार असल्याने ठाणे मनपाकडून तो प्रकल्प भंडार्लीत सुरु केला. तरीही शीळ दिवा खाडी किनारी टाकला जाणारा हा कचरा नक्की कोणाचा आणि तो कोणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात येत आहे, हे अजून ही कळलेले नाही. मात्र भंडार्लीतील काही महिन्यांसाठी सुरु झालेला हा प्रकल्प कालावधी संपल्यानंतर देखील सुरूच आहे. तर भंडार्ली प्रकल्प बंद होताच डायघर येथील प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. तसेच प्रकल्प सुरु होताच डायघर मधील नागरिकांचा देखील या प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेता हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे सध्या तरी डायघर मधील प्रकल्प सुरू झालेले असताना कचरा मात्र शीळ दिवा या रस्त्याच्या कडेला टाकण्यास सुरुवात झाल्याने खाडी किनारी सुरु झालेल्या नव्या डम्पिंगमुळे दिवेकरांमध्ये नाराजी वाढत आहे. कल्याण ग्रामीण भागातील वाढत्या कचरा कोंडीमुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

मात्र दिव्यातील डम्पिंग बंद केल्यांनतर आता पुन्हा नवे डम्पिंग सरू झाले नाही ना ? असा प्रश्न उपस्थित नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. शीळ दिवा रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून कचऱ्याचे ढिगारे खाडीत जाण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खाडी किनारी असलेल्या जैवविधतेला त्याने धोका उत्पन्न झाला आहे. तर या कचऱ्याच्या गाड्या कोण थांबवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असून शीळ दिवा रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणारा कचरा कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता टाकण्यास सुरुवात झाली आहे. दिवस रात्र कचऱ्याच्या या गाड्या रस्त्याच्या कडेला खाडीकिनारी रिकाम्या केल्या जात आहेत. त्यामुळे हे कचरा टाकण्याचे नवे ठिकाण कोणी सुरु करून दिलं आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. पण याकडे पालिका अधिकाऱ्यांचे जाणून बजून दुलर्क्ष होत आहे वा त्यांच्या मार्फत कचऱ्याच्या कोणत्याच गाडीवर पालिकेकडून कारवाई ही केली जात नाही आहे.

विनोद वास्कर, ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक- मालक संघटना, अध्यक्ष, शीळ गाव- आम्ही रोज या रस्त्याने प्रवाशांना आणि शाळेतील लहान मुलांना ये - जा करत असतो. गेल्या एक महिन्यापासून येथे कचरा टाकला जात आहे. डम्पिंगच्या  भागात दोन ते तीन शाळा आहेत. त्या शाळेत येताना कचऱ्याचा फार उग्र वास सूटलेला असतो. त्यामुळे लहान मुलांबरोबर नागरिकांनाही श्र्वास घेणे मुश्किल होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post