ठाणे : आम आदमी पक्षाने दिल्लीत सुरू केलेल्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या 'आपला दवाखान्याची' व्याप्ती वाढविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. आपला दवाखान्यात आता प्राथमिक उपचारांसोबतच विविध आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेता येणार आहे. आता यापुढे आपला दवाखान्यात फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ,बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग, मानसोपचार तज्ज्ञ तसेच कान, नाक, घसा तज्ज्ञ विशिष्ट वेळेत उपचार आणि वैद्यकीय सल्ला देण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे झोपडपट्टीतील सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ४५ ठिकाणी आपला दवाखाना उत्तम स्थितीत सुरू आहेत. वाढता प्रतिसाद पाहून आता आणखी ६७ ठिकाणी आपला दवाखान्याची निर्मिती होणार आहे.ठाण्यातील झोपडपट्टी परिसरात नागरीकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना पुढे आली. याठिकाणी रुग्णांना मोफत औषधोपचार, ईसीजी, रक्त तपासणी, औषधे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आता आपला दवाखाना ही संकल्पना सुरू केली आहे. दुपारी दोन ते रात्री १० वाजेपर्यंत हा दवाखाना सुरू असतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पुढील पाच वर्षासाठी पालिकेच्या वतीने १६० कोटींचा खर्च केला जाणार आहे. शहराच्या विविध भागात आतापर्यंत ४५ आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्यात आले आहेत. आता यामध्ये आणखी ६७ दवाखान्यांची भर पडणार आहे.
यामध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी २ ते ५ या वेळेत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. खासगी दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी किंवा वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी झोपडपट्टीतील सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. मात्र आता हीच सेवा आपला दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विशेष करून झोपडपट्टीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या तज्ञ डॉक्टरांमध्ये फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ यांनी वर्षातून ५० भेटी आपला दवाखान्यात देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तर नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार तज्ज्ञ तसेच कान, नाक, घसा तज्ज्ञ यांनी वर्षातून प्रत्येकी २५ भेटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक भेटीनुसार या तज्ज्ञ डॉक्टरांना मानधन मिळणार आहे.
.jpeg)