डोंबिवली ( शंकर जाधव ): नवनियुक्त पालिका आयुक्त नवनियुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील सहाय्यक आयुक्त देशमुख, पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे व कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवत अनधिकृत फेरीवाले आणि शेडवर कारवाई करण्यात आली.
एक जेसीबी व डंपरच्या सहाय्याने केलेल्या कारवाई पूर्वेकडील मधूबन गल्लीतील सर्व अनधिकृत शेड तोडण्यात आले.सकाळपासून कारवाई सुरू असल्याचे पाहून फेरीवाले आपले बस्तान घेऊन निघुन गेले होते. उर्सेकरवाडी, मधूबन गल्ली येथे दुकानदारांनी अनेक वर्षांपासून अनधिकृत शेड लावले होते.अनेक वेळेला कारवाई होऊनही दुकानदार कारवाई न जुमानता अनधिकृत ब शेड लावत असल्याने याठिकाणी गर्दी होत असताना दिसते.
गुरुवारी पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाईला सुरूवात केल्याने अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले होते.तर दुकानदारांनी अनेक वर्षांपासून फुटपाथवर केलेले अतिक्रमण हटविण्यात आले.डोंबिवली पूर्वेकडील 'ग' प्रभाग क्षेत्र हद्दीतील स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवत मधुबन गल्लीतील अनधिकृत शेड जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.तर रामनगर तिकीट घरासमोरील दुकानदारांनी केलेले फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले.पालिकेची ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसले.तर काही नागरिकांनी ही कारवाई आपल्या मोबाईल मध्ये कैद केली.एकीकडे पालिकेच्या कारवाईने डोंबिवलीकर खुश होत असताना दुसरीकडे मात्र फेरीवाले पालिकेच्या नावाने बोटे मोडत होते.यादरम्यान पालिकेच्या कारवाईत सातत्य राहावे असे नागरिक म्हणत होते.

