दिवा, (आरती मुळीक परब) : मध्य रेल्वे मार्गावरील ठाण्याच्या पुढे दिवा जंक्शन स्टेशन लागते. तेथे अधिकृत हमाल नसल्याने स्टेशनवर बुट पॉलिश करणाऱ्यांना जखमी प्रवाशांना वा रेल्वेने दिवा स्टेशनसाठी आलेले सामान कमी मोबदल्यात उचलावे लागते.
दिवा जंक्शनवर मध्य रेल्वेच्या लोकल आणि दिवा- वसई, दिवा- पनवेल, दिवा- रोहा, दिवा- सावंतवाडी, दिवा- पेण, दिवा- रत्नागिरी अशा विविध मार्गांनी गाड्या येत जात असतात. आधी फाटक सुरू असताना रोजच्या रोज अपघात होऊन नागरिक जखमी अथवा मृत व्हायचे. त्यांना उचलण्यासाठी ही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अधिकृत हमाल नसल्याने या बुट पॉलिश करणाऱ्यांनाच स्ट्रेचर घेऊन उचलावे लागायचे.
तसेच स्टेशनचे कोणतेही सामान आल्यास त्या बुट पॉलिश करणाऱ्यांना स्वतःचा धंदा बंद ठेवून ते सामान दिवा स्टेशन ऑफिसमध्ये पोचवावे लागते. त्यासाठी त्यांना कधी मोबदला मिळतो. तर कधी तो मिळतही नाही. आताही दिवा स्टेशनवर प्रवाशी जखमी झाल्यास वा प्रवाशाला चक्कर आल्यास त्याला उचलण्यासाठी या बुट पॉलिश करणाऱ्यां बोलवावे लागते. ही हमालाची गरज लक्षात घेता. रेल्वेने लवकरात लवकर अधिकृत हमाल नेमावे अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
दिवा रेल्वे स्टेशनला हमाल नसल्याने अपघातानंतर त्या प्रवाशाला उचलायला कोणीच पुढे येत नाही. रात्रीच्या वेळेस अपघात झाल्यास काहीच मदत करता येत नाही. कारण प्रवासी ही कमी असतात. तसेच त्यांना घरी जाण्याची घाई असते. आम्ही रेल्वे हमालाची मागणी २०१८ पासून केली असून त्याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने अजूनही हमालाची भरती झालेली नाही.
श्रावणी गावडे,
अध्यक्ष, आम्ही दिवा रेल्वे प्रवाशी संघटना