ठाकरेंच्या शिवसेनेतील रोहिदास मुंडे यांचा हल्लाबोल
दिवा, (आरती मुळीक परब) : पोलीस खातं हे भाजपच्या हातात आणि महाराष्ट्र राज्यात शिंदे - भाजपची सत्ता आहे, मग दिव्यातील चौकात दारू पिणाऱ्या बेवड्यांना हटवणार कोण? असा खरमरीत सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख, माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा टर्निंग येतील उघड्यावर दारू पिणाऱ्या दारुड्यांना हटवा, अशी मागणी आठ दिवसापूर्वी केली होती. त्यानंतर नुकतीच राज्यात सत्तेत असणाऱ्या व गृहमंत्री पद असणाऱ्या भाजपने दिवा टर्निंग येथील खुल्या मैदानात बसणाऱ्या मद्यपींना हटवा, अशी मागणी पोलिसांना निवेदन देऊन केली आहे. ज्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे, त्याच पक्षाचे लोकं स्टंट करत असतील, तर मग दिवा टर्निंग वरील मद्यपींना हटविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत का? असा खोचक टोला मुंडे यांनी लगावला आहे. शिंदे - भाजप सरकारने एक फोन करून पोलिसांना सांगितले तरी येथील दारुडे हटविले जातील, पण असे का केले जात नाही? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी जनतेला द्यावे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. सत्तेत असणारेच आंदोलनाची नौटंकी करत असतील, तर उघड्यावर दारू पिणाऱ्या दारुड्यांना नेमकं हटवणार कोण? असा खरमरीत सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केला आहे.