सुमारे ११ हजार घरे विक्रीविना पडून
मुंबईत: म्हाडाच्या घरांची असलेली अधिक किंमत हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच घरांची विक्री मोठ्या प्रमाणात होत नसल्याचे अनेक वेळेस निदर्शनास आले आहे. अशावेळेस अनेक वर्षापासून म्हाडा लॉटरीतील हजारो घरे विक्रीविना राहिल्याने त्याचा फटका म्हाडाला बसत आहे. त्यामुळेच अशा विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेण्यात येत असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतूल सावे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात म्हाडाच्या किमतीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्याच्या काळात गगनाला भिडलेले जागेचे दर आणि महागलेल्या बांधकाम साहित्यामुळे स्वत:च्या मालकीचे घर घेणे सर्व सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती सर्वांना परवडतील अशा नसतात, त्यामुळेच गरीब व मध्यम वर्गीयांनी म्हाडाच्या घरांकडे पाठ फिरविल्यान चित्र पहावयास मिळत आहे.मात्र आता म्हाडाने घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याने गरीब आणि मध्यम वर्गीयांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतूल सावे यांनी म्हटले आहे.
म्हाडाच्या सुमारे ११ हजार घरे विक्री झालेली नसल्यामुळे त्यांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचे वीजबिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्याने म्हाडाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आल्याचेही यावेळी मंत्री सावे यांनी सांगितले आहे.
पुण्यातील ५,८६३ सदनिकांची लॉटरी प्रक्रिया पुढे ढकलली
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता उद्या (२४ नोव्हेंबर) रोजी संगणकीय सोडत होणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही सोडत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे म्हडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.