आईने मानले बाजारपेठ पोलिसांचे आभार
डोंबिवली ( शंकर जाधव) : कल्याण कृषी उत्पन्न बाजारातून एका फूले पाने विक्रेत्या महिलेची चार वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाली. घाबरलेल्या आईने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीचा शोध सुरु केला.
१८ तासाच्या तपासात पोलिसांनी चिमुकलीचा शोध घेतला. पोलिसांनी चिमुकलीला आईच्या स्वाधीन केल्यानंतर आईने पोलिसांचे आभार मानले.
कल्याण पश्चिमेतील जोशी बागेत राहणारी सुनिता माळी या महिलेचा कल्याण पश्चीमेतील एपीएमसी मार्केटमध्ये फुले विकण्याचा व्यवसाय आहे. तिच्यासोबत तिची चार वर्षाची मुलगी अनन्या ही देखील तिच्या सोबत होती. अचानक मार्केटमधील शेतकरी कट्टा येथून वर्षाची अनन्या गायब झाली. आईने तिचा मार्केटमध्ये शोध घेतला असता ती सापडली नसल्याने आपल्या मुलीला कोणी तरी संशयित व्यक्तीने तिला उचलून नेल्याचे महिलेला संशय आला. आपल्या मुलीला उचलून नेल्याचा संशय असल्याचे आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात संगितल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांनी तीन पथके तयार केली. सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे,वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल पवार. पोलिस निरिक्षक लक्ष्मण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस अधिकारी किरण वाघ, महिला पोलिस अधिकारी दीपाली वाघ, पोलिस उपनिरिक्षक संतोष भुंडेरे, अजिंक्य मोरे, यांच्या पथकाने मुलीचा तपास सुरु केला. चिमुकलीचा शोध घेतल्यासाठी पोलिसांनी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. १८ तास पोलिसांची तीन पथके या मुलीचा शोध घेत होते. अखेर पोलीस अधिकारी पंकज परदेशी यांना माहिती मिळाली की ही मुलगी एका महिलेकडे आहे. पोलिस पथक रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्या महिलेच्या घरी गेले.त्या महिलेने चिमुकलीला सुरक्षितेतेसाठी तिला घरी ठेवले असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी अनन्या घेऊन तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे. 18 तास आपल्या चिमुकलीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेच्या माऊलीचे आपल्या चिमुकलीला बघून डोळे पाणवले . या चिमुकलीच्या आईने पोलिसांचे आभार मानले.
