- १२ वर्षाखालील मुलांची विजयी सुरुवात
- आंतरराज्य शालेय थ्रोबॉल चॅम्पियशिप २०२३-२४ स्पर्धा
मुंबई: मुंबई स्कूल स्पोर्ट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या आंतरराज्य शालेय थ्रोबॉल चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात वसंत विहारच्या खेळाडूंनी तीन डावात गोकुळधामचा १८-२१, २१ -१६ आणि २१-१६ ने पराभव करत पहिले जेतेपद पटकाविले.
माटुंगा येथे झालेल्या आंतरराज्य शालेय थ्रोबॉल चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी झालेल्या वसंत विहारच्या खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या पहिल्या जेतेपदावर नाव कोरले. १२ वर्षाखालील गटात वसंत विहार आणि गोकुळधाम यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात गोकुळधाम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाणेफेक जिंकून आक्रमक खेळ करत सामन्यात आपली पकड मजबूत केली. गोकुळधामने पहिल्या डावात अत्यंत शानदार खेळ करत वसंत विहारच्या खेळाडूंना सावरण्याची संधीच दिली नाही आणि २१-१८ ने विजयी सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या डावात वसंत विहारच्या खेळाडूंनी उत्तम खेळ करत डावात पुनरागमन केले आणि गोकुळधामच्या खेळाडूंवर २१-१६ ने विजय संपादन करत स्पर्धेत बरोबरी साधली.
तिसऱ्या आणि निर्णायक डावात वसंत विहारच्या खेळाडूंनी गोकुळधामच्या खेळाडूंना वर्चस्व प्रस्थापित करण्याची एकही संधी दिली नाही. कर्णधार स्वयंश ब्राम्हणेच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा स्पर्धेत दाखल झालेल्या वसंत विहारच्या खेळाडूंनी गोकुळधामच्या खेळाडूंची जेतेपद पटकाविण्याचे स्वप्न २१-१६ ने अक्षरशः धुळीस मिळवले. वसंत विहारच्या खेळाडूंनी याआधीच्या विविध गटात विजय संपादन केला आहे, मात्र १२ गटातील खेळाडूंच्या विजयाने त्यांचा आत्मविश्वास बळावल्याचे प्रशिक्षक दीपक कोटियन यांनी म्हटले. तर प्रशिक्षका पूजा दहिवलकर यांनी स्पर्धेतील मुला-मुलींच्या खेळाचे कौतुक केले. शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन गावडे आणि प्राचार्य गीता नायर यांनी पहिल्याच स्पर्धेत जेतेपद पटकाविल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन केले.
वसंत विहारच्या १२ वर्षांखालील मुले, १४ ( मुली) आणि १६ वर्षांखालील मुलांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जेतेपद पटकाविले. तर वसंत विहारच्याच १४ वर्षांखालील मुलांना १६ वर्षांखालील मुलींना दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

