डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना कल्याण तालुका प्रमुख तथा कल्याण जिल्हा कल्याण जिल्हा समन्वयक महेश पाटील यांनी वाढदिवसाला जनतेला आवाहन केले होते की, सध्याची आपल्या सभोवतालची परिस्थिती पाहता, समाजात शैक्षणिक क्षेत्रात अनेक गरजू आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. याकरिता, आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, महागड्या भेटवस्तु, पुष्पगुच्छ व केक यापैकी काहीही न आणता मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किमान एक वही, पेन व विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तु भेट देऊन शुभेच्छा द्याव्यात. जेणेकरून आपण दिलेल्या भेटवस्तुचा उपयोग एखाद्याला शिक्षण घेण्यास उपयोगी पडेल व आपण मिळुन लावलेला समाजसेवेचा वटवृक्ष आणखीन भक्कम व मोठा होण्यास मदत ठरेल.त्यानुसार महेश पाटील यासह अनेकांनी संकल्प संस्था निळजेच्या कोळेगाव घेसर रोडवरील संकुलास भेट दिली.
वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरु असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. शाळेच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्वोदय विद्यालय निळजेचे मुख्याध्यापक वीरेंद्र वसंत पाटील व भुमीपुत्र धर्माभिमानी संघटनेचे रोशन भोईर उपस्थित होते. तसेच मलंगगड रोडला गरजूंना अन्नधान्य वाटप, पाथरलीला आयुष्यमान भारत कार्ड आणि आधारकार्ड शिबीर, आरोग्य शिबीर, खोणी म्हाडा कॉलनी, डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसरात जेवण वाटप, पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात फळे वाटप, आश्रमात फळे वाटप, ज्येष्ठ नागरिक कट्टयावर नेत्र तपासणी आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी समाजसेवक सुजित नलावडे, बाकाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.