दोन वर्षांपासून तीर्थक्षेत्रांची स्वच्छता मोहीम
आस गुरुदर्शनाची असली की, आपोआप पाऊले वळतात ती गुरु पादुकांचे दर्शन करण्यासाठी आणि मग मनातून, अंत:करणातून आपोआप नामस्मरण सुरू होते आणि आपण श्री चरणी केव्हा लीन होतो हे आपले आपल्यालाच कळत नाही.
अशीच आस घेऊन आस गुरुदर्शनाची ....जय शंकर भक्त परिवार, मुंबई हा भक्त परिवार गेली दोन वर्षे तीर्थक्षेत्रांची स्वच्छता मोहीम हाती घेत आला आहे.
अनेक तीर्थक्षेत्री भक्तगण येतात आणि नकळतपणे तेथे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, बिस्किटांची रिकामी पाकिटे, वेफर्सची रिकामी झालेली पाकिटे अशा अनेक टाकाऊ गोष्टींचा कचरा करून जातात.
स्वतःचे घर स्वच्छ करणारे आपण देवस्थान कचरामय का करून जातो हा एक यक्षप्रश्न आस गुरुदर्शनाची... जय शंकर भक्त परिवार यांच्या समोर उभा राहिला आणि त्यातूनच तीर्थक्षेत्र स्वच्छतेचा सेवार्थ भाव पुढे आला.
या भक्त परिवाराने या आधी गाणगापूर, गिरनार अशा तीर्थक्षेत्री स्वच्छता सेवा दिली आहे. याचा परिणाम म्हणून तेथील प्रशासनाला याची दखल घेऊन गिरनारच्या वाटेवर कचरा कुंड्या व सफाईबाबत जागरूकतेचे फलक लावावे लागले. प्रशासनातर्फे स्वच्छता सेवकांचा एक गट नेमण्यात आला आहे. अनेक भक्तगणांमध्ये जागरूकता निर्माण होताना दिसत आहे कारण यावेळी नुकतीच आयोजित करण्यात आलेली गिरनारची तिसरी स्वच्छता सेवा ६०% स्वच्छतेचा परिणाम दिसून आल्याने सफाईसुद्धा कमी करावी लागली. ही सर्व त्या दत्तगुरूंची किमया आहे. समाधान याचेच आहे की, कड्यात / दरीत उतरण्यासाठी दोरखंड आदी प्रस्तरारोहणाचे इतके जड साहित्य आणूनसुद्धा वरती घेऊन न जाताच स्वच्छता सहज झाली. आलेल्या भक्तगणांना कचरा न करण्याची बुध्दी महाराजांनीच दिली असेच म्हणावे लागेल
तीर्थस्थानांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या या जय शंकर भक्त परिवाराने आपल्या कृतीतून सामाजिक प्रबोधन आणि अस्वच्छता न करण्याचा आदर्श घालून दिला आहे. याबाबत सर्व मान्यवर संस्थाकडून, प्रशासन, समाजातील अनेक मान्यवर तसेच अनेक भक्त परिवारांतून आस गुरुदर्शनाची... जय शंकर भक्त परिवार,मुंबई यांचे हा आदर्श घालून दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
अनेक मान्यवरांच्या प्रति आपल्या सद्भावना व्यक्त करताना जय शंकर भक्त परिवाराने प्रामुख्याने उल्लेख केला त्यापैकी १) पप्पा पुराणिक ( पुणे ) २) रविंद्र साळुंके ( पुणे ) ३) सरदार कुलबीरसिंग बेदी (प्रादेशिक संचालक, रोप वे जुनागढ) ४) गोविंदभाई राजपूत (सरव्यवस्थापक, रोप वे) ५) प्रशांत गोहिल, प्रेम भाई, मिलन भा, जितू भाई (हे सर्व स्थानिक रहिवासी ) ६) तसेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपली सेवा गुप्तपणे देणारे अनेक बंधू-भगिनी, भक्तगण या सर्वच ज्ञात अज्ञात दत्त म्हणून सोबत उभ्या राहिलेल्या भक्तगणांचे व हितचिंतकांचे जय शंकर भक्त परिवार सदैव ऋणीच आहेत. शेवटी दत्ता तुझीच सत्ता म्हणत हा परिवार याचे सर्व श्रेय श्रीगुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करत आहेत.
सर्व करता करविता तोच आहे.
तोच तिन्ही जगाचा स्वामी आहे / मालक आहे.
आमच्या हातून तो हे महत्तकार्य करवून घेत आहे हेच आमचे भाग्य आहे. असेच नम्रपणे हा परिवार सांगत आहे. त्यांच्याकडून केली जाणारी अशीही गुरुसेवा खरंच बोध घेण्यासारखी आहे.