कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश..
पावणे चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत..
डोंबिवली ( शंकर जाधव ) : लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडण्यास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.अटक केलेल्या चोरट्याकडून फसवणुकीच्या गुन्हयातील सोन्याचे दागिने असा एकूण ३,७३,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.हे चोरटे कल्याण एसटी बस स्टॅण्ड येथून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होते.पोलिसांनी एसटी स्टॅण्ड येथे सापळा रचून पकडून बेड्या ठोकल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, नरेश विजयकुमार जैसवाल ( ४० वर्षे, रा. डी १. रूम नं. १०१, शांती सुमती बिल्डींग, म्हाडा कॉलणी, भारतनगर, चेंबुर, मुंबई नं. ७४ आणि अनिल कृष्णा शेट्टी (४५ रा. होमवावा टेकडीवर भाइयाची खोली, हणुमान नगर, नेतीवली नाका, कल्याण पुर्व ) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. गुरुवार ८ तारखेला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस हवालदार किशोर पाटील व पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र लांडगे यांना माहीती मिळाली की, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील फसवणुक करणारे दोन संशयीत इसम कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एसटी बस स्टॅण्ड येथे येवून तेथून एसटी बसने बाहेर गावी जाणार आहेत. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या आदेशानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कल्याण एस.टी. स्टॅण्ड येथे सापळा रचला.एस.टी. स्टॅण्ड येथे नरेश आणि अनिल आले असता पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडले.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेल्या दोघांना पुढील तपासकरता मिळून आलेल्या मुद्देमालासह महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हजर केले.
सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे ) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) शिवराज पाटील, सहा पोलीस आयुक्त ( गुन्हे ) निलेश सोनावणे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संदिप चव्हाण, सपोनि संतोष उगलमुगले, पोउनि संजय माळी, पोलीस हवालदार किशोर पाटील, विलास कडू, बालाजी शिंदे, वापूराव जाधव, अनुप कामत, पोलीस नाईक सचिन वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र लांडगे, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, चा.पो.हवा. अमोल बोरकर यांनी बजावली आहे.