देशभरातील ३ हजार ५०० धावपटू धावणार
कल्याण ( शंकर जाधव ) : अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत देशातील दर्जेदार अर्ध मॅरेथॉन स्पर्धा असा नावलौकिक प्राप्त केलेल्या कल्याणच्या आयमेथॉन ४ मध्ये यंदाही रेकॉर्डब्रेक धावपटू सहभागी होणार आहेत. या आयमेथॉनला अद्याप १० दिवस शिल्लक असतानाच तब्बल ३ हजार ५०० धावपटूंनी या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली आहे. येत्या १७ डिसेंबर २०२३ रोजी ही आयमेथॉन ४ स्पर्धा होणार असून त्याद्वारे जमा होणारा सर्व निधी हा समाजातील वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या सजग संस्थेला दिला जाणार आहे. या आयमेथॉन ४ बाबत आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांतर्फे ही माहिती देण्यात आली. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्स ग्रुपतर्फे गेल्या ३ वर्षांपासून ही आयमेथॉन अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे.
विशेष म्हणजे पहिल्या स्पर्धेपासूनच या आयमेथॉनमध्ये हजारांच्या संख्येमध्ये धावपटूंनी सहभाग घेतला आहे. २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. तर या स्पर्धेसाठी केवळ कल्याण, डोंबिवली, ठाणे , मुंबई परिसरासह पंजाब, केरळमधील धावपटूंनी नाव नोंदणी केली आहे. तर ७६ दिवसांत कन्याकुमारी ते काश्मीर अशी देशाची दोन टोकं धावणारे दिग्गज धावपटू आशीष कसोदेकर आणि नऊवारी साडी नेसून बर्लिन मॅरेथॉनमध्ये गिनीज बुक रेकॉर्ड करणाऱ्या क्रांती साळवी स्पर्धकांचा उत्साह वाढवायला उपस्थित राहणार आहेत.