रविवारपासून दुरुस्तीचे काम सुरू
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन, चारवरील जीना रविवारपासून ४० दिवस प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडील पादचारी पुलांना जोडणाऱ्या फलाट क्रमांक तीन आणि चारवरील जिन्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम ३१ डिसेंबरपासून मध्य रेल्वेकडून सुरू केले जाणार आहे. या कामामुळे हा जिना पुढील ४० दिवस प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
३० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून या जिन्यांचा वापर प्रवाशांसाठी बंद केला जाणार आहे. या दुरुस्तीच्या कालावधीत प्रवाशांनी कल्याण किंवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस बाजुकडील डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिन्यांचा वापर फलाट क्रमांक तीन किंवा चारवर चढ, उतार करण्यासाठी करावा, तसेच, प्रवाशांनी फलाटावरून पादचारी पुलावर चढणे किंवा उतरण्यासाठी या भागातील सरकत्या जिन्यांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासना कडून केले जात आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची सकाळ, संध्याकाळची वाढती गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा जवानांना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि या भागात होणारी प्रवाशांची झुंबड विचारात घेऊन येथील पाचचारी पुलावर सकाळ, संध्याकाळ तैनात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.