नवी मुंबई : दिघ्यापासून २७ डिसेंबरला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला सर्व विभागांमधील नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी सेक्टर १५ ऐरोली येथील विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी उपस्थित राहत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra modi). यांच्या संकल्पनेतून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या यात्रा उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन केले. जनकल्याणासाठी कटिबध्द राहून सरकार विविध कल्याणकारी योजना राबवित आहे त्या नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी यात्रा उपक्रम लाभदायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सेक्टर १५, ऐरोली येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रमाप्रसंगी २७० पुरुष आणि ४०५ महिला अशा ६७५ नागरिकांनी सकाळी १० ते १ या वेळेत उपस्थित राहून योजनांविषयी माहिती जाणून घेत उपक्रमाचा लाभ घेतला. याप्रसंगी आमदार गणेश नाईक यांच्यासमवेत उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, माजी नगरसेवक अशोक पाटील, अनंत सुतार, ममित चौगुले, संगीता पाटील, शशिकला सुतार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने १८ जानेवारी २०२४ पर्यंत महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये ४५ ठिकाणी चालणाऱ्या यात्रा उपक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या व नागरिकांच्या मोठया संख्येने उपस्थितीत यात्रेचा उद्देश सफल होताना दिसत आहे.
दि. २८ डिसेंबर रोजी यादवनगर येथे १२५० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सकाळच्या सत्रानंतर दुपारी ३ ते ६ या वेळेत ऐरोली गावदेवी मैदान येथील दुपारच्या सत्रातही ६२२ नागरिकांनी सहभागी घेतला होता. ऐरोली गावदेवी मैदान येथील उपक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक अनंत सुतार व शशिकला सुतार आणि इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.
ऐरोली विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी अशोक अहिरे यांनी यात्रेचे महत्व सांगून पंतप्रधानांची यात्रा आयोजना पाठीमागील भूमिका विशद केली. दोन्ही ठिकाणी उपस्थितांनी ‘आपला संकल्प विकसित भारत’ शपथ ग्रहण केली.
या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये एलईडी व्हॅनवरून पंतप्रधान महोदयांचा संदेश प्रसारित करण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. या यात्रेच्या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे व अर्ज नोंदणी करणारे स्टॉल लावण्यात आले होते त्यालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने भेटी देत माहिती जाणून घेतली.