पालिका आयुक्तांच्या कामांबाबत मनसेचा पाठिंबा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. जे प्रश्न मांडले जात आहेत त्यांना मुख्यमंत्री शिंदे हे सकारात्मक प्रतिसाद असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची भेट घेत असल्याचे आमदार पाटील यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर पालिका आयुक्त डॉ. इंदराणी जाखड यांच्या कामाचेही कौतुक करत मनसेचा पाठिंबा असल्याचे सांगितले.
डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने भव्य आगरी कोकणी महोत्सव जत्रा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी जत्रेला भेट दिली.यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, उपशहर अध्यक्ष प्रेमराज पाटील यांसह संदीप ( रमा ) म्हात्रे, श्रीकांत वारंगे, सुमेधा थत्ते, प्रमिला पाटील यांसह अनेक मनसैनिक उपस्थित होते.
यावेळी पत्राकारांशी बोलताना मनसे आमदार पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून सहा ते सात वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. एक दोन वेळेला मी सुद्धा सोबत होतो. सातत्याने राज्यातले वेगवेगळे विषय घेऊन राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री हे काही सूचना मान्य करतात, कामे होत आहेत म्हणून मनसे राज ठाकरे हे भेट घेतात. यापूर्वी आमच्या सूचना विचारात घेतल्या जात नव्हत्या. म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे जात नव्हते. आता जे प्रश्न मांडले जात आहेत त्यांना मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे काम चांगले आहेत. शहरातील कामांबाबत भेट घेतल्यानंतर मी सांगितले होते कि, दोन्ही शहरे तुम्ही समजून घ्या, इच्छाशक्ती असेल तर हा स्टेशन परीसर सुधारला जाऊ शकतो. डीपी रोडच्यामध्ये आलेले अनधिकृत कामे हटवून लोकांना चांगला दिलासा दिला जाऊ शकतो असे सांगितले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने कामे सुरू केली आहेत त्याबद्दल पालिका आयुक्तांचे अभिनंदन करतो.पालिका आयुक्तांनी चांगली सुरुवात केली असून त्यांना मनसेचा पाठींबा आहे.