महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या पैलवान वैष्णवी पाटील व सानिया देसलेचे सुयश

 

    कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर संघटनेकडून स्वागत 

कल्याण ( शंकर जाधव ) :  चंद्रपूर ब्रम्हपुरी येथे झालेल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणची वैष्णवी पाटीलने ६२  किलो वजनी गटात खेळताना सुवर्ण पदक पटकावले आहे. तर कल्याणमधील सानिया देसलेने कुमार गटातून ४६ किलो वजनी गटा कांस्य पदक  पटकाविले. बुधवारी या दोघींचे कल्याण - डोंबिवली कुस्तीगीर संघटनेकडून जंगी स्वागत करण्यात आले.

     कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर संघटनेतर्फे नांदिवलीचे माजी सरपंच रामदास ढोणे,कुस्तीगीर संघटनेचे पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी बुधवारी वैष्णवी पाटील व सानिया देसले या विजयी खेळाडूंचे कल्याण रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केले.

    वैष्णवी अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळ या गावतील आहे. वैष्णवीला  लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती.तिच्या आईवडिलांनी तिची आवड जोपासत  प्रोत्साहन दिले. वैष्णवी  हिने कल्याणमधील नांदीवली गावातील जय बजरंग तालमीत कुस्तीच धडे गिरवले. आतापर्यंत तिने सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. मार्चमध्ये महिला कुस्तीगीरासाठी सांगली येथे आयोजित पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटीलने कामगिरी करत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. वैष्णवीने चंद्रपूर येथील चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले. वैष्णवी पाटीलने समाधान व्यक्त करत आता लक्ष ऑलिम्पिक असल्याचे सांगितले. वैष्णवी पाटील तिच्या यशा नंतर कल्याण -डोंबिवली शहरातून तीच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कल्याणमधील सानिया देसले हिने देखील कांस्य पदक पटकावले.

Post a Comment

Previous Post Next Post