सुविधा इमारती वापरात येण्याच्या दृष्टीने पालिकेची वाटचाल

 

आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सुविधा इमारतीत वापरात येण्याच्या दृष्टीने संबधित विभागांनी तत्परतेने आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वाशी विभागातील सुविधा इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून मौल्यवान सूचना केल्या. या प्रसंगी अतिरिक्त्‍ आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत जवादे, वाशीचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे, कार्यकारी अभियंता अजय संखे आणि संबधित अधिकारी उपस्थित होते.

सेक्टर १४, १५ येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत कोव्हीड काळात कोव्हीड काळजी केंद्र स्थापित करण्यात आले होते. सदर केंद्र कोव्हीड प्रभावित कालखंडानंतर बंद करण्यात आले असून सदर इमारत विविध सुविधा प्रयोजनासाठी कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी विशेष बैठकीत आढावा घेतला होता. या चार मजली इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर जाऊन आयुक्तांनी सद्यस्थितीची पहाणी केली व त्या ठिकाणी तळमजल्यावर आपला दवाखाना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले.  

वाशी सेक्टर ३ येथील भूखंड क्रमांक १२ व १३ या ठिकाणी बांधण्यात आलेल्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे नुकतेच लोकार्पण झाले असून याठिकाणी आवश्यक सुविधांची पूर्तता करुन ही इमारतही वापरात आणण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्तांनी इमारतीच्या पाहणीअंती केले. या इमारतीतील सुविधाही नागरिकांच्या वापरासाठी तत्परतेने खुल्या करण्याबाबत पाहणीअंती आयुक्तांनी निर्देश दिले.

नवी मुंबईतील नागरी सुविधांच्या इमारती ज्या प्रयोजनासाठी बांधण्यात आल्या आहेत त्याकरिता कार्यान्वित करुन देण्याकडे आयुक्त राजेश नार्वेकर बारकाईने लक्ष देत असून याबाबत सातत्याने आढावा घेत आहेत व आता या सुविधा इमारतींची प्रत्यक्ष पहाणी करुन या कामाला वेग दिला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post